भाजपला करायचं ते करु द्या, मूळ विचार पक्षाकडे असतो, तो कोणीही फोडू शकत नाही; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल म्हणून पक्ष फोडला, कोणी कितीही पक्ष फोडला तरीही मूळ विचार कोणीच फोडू शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
MP Sanjay Raut Full Press : पाच राज्यांच्या निवडणुका आगामी लोकसभेच्या (Lok Sabha Elections 2024) दृष्टीनं महत्त्वाच्या, पण निवडणूक आयोग मुंबई महापालिकेसह (Mumbai Municipal Corporation Election 2024) राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर करणार? असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल म्हणून पक्ष फोडला, कोणी कितीही पक्ष फोडला तरीही मूळ विचार कोणीच फोडू शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव यावरील निवडणूक आयोगातील सुनावणीवरही भाष्य केलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आम्हाला खात्री आहे पाचही राज्यांत आमची इंडिया आघाडी नक्कीच विजयी होईल. पाचही राज्यांच्या निवडणुका व्हायला हव्यात त्या होतीलही. पण या पाचही राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाला माझं आवाहन आहे मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका तुम्ही कधी जाहीर करताय? पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिकांवर तुम्ही जे प्रशासक नेमले आहेत, त्यामार्फत सरकार जे कारभार करतंय, भ्रष्टाचार बोकळलाय, अनागोंदी माजली आहे. त्यामुळे तुम्ही मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे."
संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेबांना विठ्ठल... विठ्ठल... म्हणत पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी हे सांगत पक्ष फोडले. भाजपनं फोडा झोडा आणि राज्य करता ही निती देशाच्या राजकारणात आणली आहे. घरं फोडायची, पक्ष फोडायचे... शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टीही फोडण्याचा त्यावेळी प्रयत्न करण्यात आला... फोडू द्या ना... तुम्ही कितीही पक्ष फोडले आमचे, तरी मूळ विचार हा मूळ पक्षाकडे असतो. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीच आहे."
भाजपनं देशाची लोकशाही, घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार सुरू केलेत : संजय राऊत
"लोक ज्यावेळी म्हणतात शिंदेंची शिवसेना लोक हसतात. लोक म्हणतात अजित पवारांची राष्ट्रवादी लोक हसतात. लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करते. शरद पवार हयात आहेत, अस्तित्वात आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवार समोर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार दावा सांगत आहेत. मग समोर बसलेले शरद पवार मेणाचा पुतळा आहे का? निवडणूक आयोगालाही काही वाटलं पाहिजे, समोर पक्षाचा संस्थापक बसलेला आहे. उद्धव ठाकरे इथे बसलेले आहेत आणि पक्षावर कोणीतरी दावा सांगतो. हे प्रकार भाजपनं सुरू केलेले आहेत. ते या देशाची लोकशाही आणि घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार आहेत.", असं संजय राऊत म्हणाले.
तुम्हाला दिल्लीतून काळी टोपी वाल्यांची स्क्रिप्ट येतं, ते तुम्ही वाचून दाखवता : संजय राऊत
"हो हुकूमशाह आहोत आम्ही. ज्या हुकूमशाहानं अजित पवारांना पाच वेळा उपमुख्यमंत्री केलं, ज्या हुकूमशाहानं प्रफुल्ल पटेलांना केंद्रापासून राज्यापर्यंत पदं दिली, ज्या हुकूमशाहानं तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रीपद दिलं, तुम्ही कोणाला हुकूमशाह म्हणताय? लाज वाटली पाहिजे असे शब्द वापरताना. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करते. तुम्ही आमच्यावरही तेच आरोप करताय. हे आरोप तुम्ही करत नसून दिल्लीतून काळी टोपी वाल्यांची स्क्रिप्ट येतं, ते तुम्ही वाचून दाखवता.", असं संजय राऊत म्हणाले.
पाहा व्हिडीओ : भाजपनं देशाची लोकशाही, घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार सुरू केलेत : संजय राऊत