अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना विरोध करून सुजय विखेंना (Sujay Vikhe Patil) पाठिंबा देणं हे माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांना भोवलं आहे. विजय औटी यांना शिवसेना ठाकरे गटातून निलंबित करण्यात आलं आहे. विजय औटी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे म्हणत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने हे निलंबन करण्यात आले आहे.

Continues below advertisement


अहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे. विजय औटी यांनी मविआमध्ये असताना भाजप उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा दिल्याने नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. 


पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषदेत घेत आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सोबत म्हणजेच निलेश लंके यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता विजय औटी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आल आहे.


महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याची सुजय विखेंची खेळी? 


गेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी विजय औटी यांच्याविरोधात निवडणूक लढवल्यानेच औटी यांनी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चा होती. मात्र मधल्या काळात बाजार समितीच्या निवडणुकीत विजय औटी आणि निलेश लंके यांनी जुळवून घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मग तरीही मविआमध्ये एकत्र असताना लोकसभा निवडणुकीत औटीनी आपली भूमिका बदलल्याने ही सुजय विखेंचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे.


सुजय विखेंनीदेखील यावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या एका वर्षापासून पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे शोषण झाले आहे. जेव्हा 4 जूनला निकाल लागेल त्या दिवशी पारनेर तालुक्याचे मतदान पाहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर असेल असं सुजय विखे यांनी म्हटलंय. 


निलेश लंके आणि विजय औटी यांचा जुना संघर्ष


खरंतर विजय औटी आणि निलेश लंके यांच्यातील 2019 पासूनचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितला आहे. विजय औटी हे शिवसेनेचे आमदार असताना निलेश लंके हे पारनेर शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे दोघांनी नेहमी एकमेकांना प्रतिस्पर्धीच्या रूपात पाहिले आणि घडलेही तसेच.


एकमेकाविरोधात दंड थोपटणाऱ्या लंके आणि औटीनी 2019 ची विधानसभा देखील एकमेकाविरोधात लढविली. त्यात औटी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सुरू झालेल्या या दोघांमधील संघर्षाचा फायदा सुजय विखेंनी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी आपण निलेश लंके यांच्याच सोबत असल्याचं पत्रकार परिषदेतून सांगितलं. त्यामुळे विजय औटी यांच्या सुजय विखेना फायदा होणार का? पारनेर तालुक्यातील इतर शिवसैनिक नेमकं कुणाच्या मागे उभे राहणार? असे काही प्रश्न विचारले जात आहेत. 


ही बातमी वाचा: