अहमनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लढतींपैकी अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघाकडेही पाहिले जाते. येथील मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात थेट लढत होत आहे. निलेश लंकेंनी यंदा खासदार विखेंविरुद्ध शड्डू ठोकला असून आपल्या आमदारकीचा राजीनामा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लंकेना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊ नये, असा निरोप विखे पाटलांकडून आपणास पाठविण्यात आला होता,असा गौप्यस्फोट शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारसंघातील पहिल्याच दौऱ्यात केल्याने येथे चागंलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे, या निवडणुकीकडे बड्या राजकीय नेत्यांनीही विशेष लक्ष दिले आहे. त्यातच, उमेदवार निलेश लंके यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं म्हटलं.  


जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीचे रहिवाशी आहेत. येथील मंदिरात ते राहतात, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांनी जनआंदोलन केले होते. अण्णांच्या या आंदोलनामुळे देशभरातील तरुणाई एकटवली होती. तेव्हापासून अण्णांच्या शब्दाला देशात मान आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही अण्णा आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणातही अण्णांना विशेष स्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, अण्णांचा ते आदर करतात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करतात. आता, लोकसभा निडणुकांचे रणशिंग फुंकले असताना महाविकास आघाडीचे उमदेवार निलेश लंके यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत स्वत: लंकेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. 


ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचेही लंके यांनी या भेटीनंतर म्हटले आहे. अण्णांना मानणारा मोठा वर्ग अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी अण्णांची भेट घेऊन विखेंची कोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी  तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, औटी यांनी महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या नेत्याने लंकेंना डावलून विखेंना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तर, दोन्ही उमेदवारांकडून गाठीभेटीचे सत्र सुरूच आहे. 


विखेंसाठी मोदींची सभा


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. शरद पवारांच्या या टीकेला सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे. मात्र, ते नगरमध्येच पाच ते सहा सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलणे हास्यास्पद असल्याचं सुजय विखेंनी म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुजय विखे यांच्यासाठी अहमनगरमध्ये 7 मे रोजी सभा होत आहे. 


हेही वाचा


पंकजा मुंडेंसाठी मोदींच्या सभेचा 'मुहूर्त' ठरला; मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थळी 'चर्चा तर होणारच'