Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना आज माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून (Lok Sangram Party) पाठिंबा जाहीर करण्यात आला. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच (Congress) विरोध होत होता. काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर देण्यात आला आहे. लोकसंग्राम पक्षाने जाहीर केलेल्या पाठिंबामुळे डॉ. शोभा बच्छाव यांना त्याचा किती फायदा होईल हे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालात स्पष्ट होईल. 


धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली. डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीनाट्य सुरू झाले होते. डॉ. शोभा बच्छाव या बाहेरच्या उमेदवार असून स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि मालेगाव येथील डॉक्टर तुषार शेवाळे यांनी केली होती. 


शोभा बच्छावांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य


या नाराजीतून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देखील पक्षश्रेष्ठींकडे दिले होते. डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी रद्द करून दुसरा उमेदवार न दिल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र उमेदवार बदलाबाबत कुठलीही शक्यता दिसत नसताना काँग्रेसमधील नाराजी अधिक तीव्र होत होती.  नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांची भेट घेत तिसरी आघाडी स्थापन करून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींच्या विरुद्ध स्वतंत्र उमेदवार देण्याची मागणी केली होती. 


लोकसंग्रामकडून शोभा बच्छाव यांना पाठींबा


या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या संदर्भात बैठका देखील झाल्या होत्या. मात्र काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा प्रचार करणार असल्याचे नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र त्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून आपली भूमिका जाहीर करण्याबाबत सांगण्यात आले होते. अनिल गोटे नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पाठिंबा देतात की, तिसऱ्या आघाडीचा निर्णय कायम ठेवत स्वतंत्र उमेदवार देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर या निर्णयाची प्रतीक्षा संपली असून अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. 


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनमताचा कौल घेणारी चाचपणी?


गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल गोटे यांनी देखील डॉ. शोभा बचाव यांच्या उमेदवारीनंतर पत्रक काढून डॉक्टर सुभाष भामरे यांना पराभूत करावयाचे असल्यास स्थानिक उमेदवार देण्याची मागणी देखील अनिल गोटे यांनी केली होती. तसेच त्यांनी काढलेल्या पत्रकात डॉ. शोभा बच्छाव यांचा आयात उमेदवार असा उल्लेख देखील केला होता. मात्र आज त्यांनी जाहीर केलेल्या पाठिंब्यानंतर अनिल गोटे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे की आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून केली जाणारी जनमताचा कौल घेणारी चाचपणी आहे का ? असा प्रश्न देखील यानंतर उपस्थित होत आहे. 


शोभा बच्छाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर? 


आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल गोटे आपली उमेदवारी जाहीर करतील का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तूर्तास अनिल गोटे यांच्या पाठिंब्यामुळे डॉ. शोभा बच्छाव यांना आणि महाविकास आघाडीला कितपत पाठबळ मिळते आणि त्यातून डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल का हे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल हे मात्र नक्की. 


आणखी वाचा 


Dhule Loksabha : ...तर सुभाष भामरेंचा टॅक्सी ड्रायव्हरही पराभव करेल, लोकसंग्रामचा जोरदार हल्लाबोल, धुळ्यात मविआला पाठींबा जाहीर