हिम्मत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Devendra Fadanvis : शेकडो शिवसैनिकांसमोर मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांसह विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे.
Sushma Andhare Slam Devendra Fadanvis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची मुक्त जनसंवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी यात्रा भिवंडी तालुक्यातील पडघा गावात (Padgha) दाखल झाली. शेकडो शिवसैनिक पुरुष व महिलांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे पडघा गावात जोरदार स्वागत केले. तेथील कान्होबा मंदिरात दर्शन घेऊन जिल्हा परिषद शाळेपर्यंत पायी पदयात्रा केली. या ठिकाणी उपस्थित शेकडो शिवसैनिकांसमोर मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांसह विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे.
नितेश राणेंवर हल्लाबोल -
सत्ताधाऱ्यांचा एक आमदार जाहीरपणे बोलतो काय गुंडा गर्दी करायची असेल ते करा सागर बंगल्यावर आपला बाप बसला आहे. हे पाहून नारायण भाऊंना काय वाटत असेल की पोरगाच म्हणतो माझा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने धमकी दिली जात आहे. पोलिस व्हिडिओ बनवून बायकांना दाखवतील, हे गृहखात्याच्या खाकी वर्दीचा अपमान आहे. नितेश राणे पोलिसांना खुले चॅलेंज करतात परंतु त्याची इतकी दहशत आहे की एकही पोलीस कर्मचारी त्यांच्या विरोधात तक्रार करत नाही. पोलिस खात्यातील सर्व कर्मचारी गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालक म्हणून बघत असतात आणि या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे, परंतु असं होत नाही. परिणामी पूर्वी निर्जन ठिकाणी घटना घडत होती परंतु, आता थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार होतो म्हणजेच पोलिसांचा धाकच उरलेला नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
शांताराम मोरे यांच्यावरही हल्लाबोल -
शांताराम मोरे पर्यंत पोहोचणार कोणाला मी सोडत नसते काळजी करू नका. ज्याने ज्याने ठाकरे आणि मातोश्रीशी बेमानी केली त्या सर्वांचा चक्रवाढ व्याजासह हिशोब केला जाईल. येथील शिवसेनेचे प्रकाश पाटील यांना काय कमी केलं होतं हातमाघ महामंडळ दिलं एवढेच नव्हे तर त्यांच्या ड्रायव्हरला 2 वेळा आमदार केलं . ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती दुसऱ्यांचा गाड्यावर ड्रायव्हर होते त्यांना सुद्धा आलीसान गाड्या आणि हेलिकॉप्टर विमानातून डोंगर झाडी पाहण्याची संधी दिली परंतु काही जणांना इमानदारीचा अन्न पचत नाही आणि ते यांना पचलं नाही, असे सुषमा अधारे म्हणाल्या.
केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका -
खासदार कपिल पाटील केंद्रात राज्यमंत्री असून काय प्रश्न सोडवले त्यांनी पंचायत राज्य मधील योजना राबवण्यासाठी त्यांच्याकडे चांगली संधी होती. मी संपूर्ण भिवंडी लोकसभा फिरली आणि बघितले की या लोकांनी काय विकास केलय मुळात विकास करण्याऐवजी स्वतःची घरं भरण्यात जास्त रुची आहे. जनतेची फसवणूक करून स्वतःचा विकास करत आहेत. आज कपिल पाटलांची सभा होती तर मी विचारलं की कोण वक्ता, नेता येतोय. तर म्हणे कोणी मोठा नेता येत नाही कारण गर्दी जमत नसल्यामुळे वेगळा फंडा वापरला आहे. गर्दी जमवण्यासाठी कपिल पाटील गौतमी पाटील चा कार्यक्रम घेणार आहेत. मग त्यांचं गाणं पाटलांचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात सुरू केलाय राडा. सर्व राजकारणाचा चिखल केला आहे. कपिल पाटील आणि शांताराम मोरे यांना यावेळी दाखवून द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला जिंकू शकतो तर तुम्हाला हरवू देखील शकतो हे त्यांना दाखवून द्यायचा आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
किरीट सोमय्यांवर साधला निशाणा -
व्हिडिओ स्पेशलिस्ट किरीट सोमय्या म्हणतात हिशोब तर द्यावाच लागेल. लोकांचा मागे ईड्या लावत फिरत होता लोकांनी त्याच्या सीड्या बाहेर काढल्या. ज्याच्या ज्याच्यावर सोमय्याने आरोप केला त्यापैकी कोणाला शिक्षा झाली. ज्यांच्यावर सोमय्याने आरोप केला त्या सर्वांना भाजप आणि गद्दार गॅंग मध्ये सामावून घेतला याचा अर्थ असा आहे की किरीट सोमय्या हा भ्रष्टाचार काढणारा माणूस नसून किरीट सोमय्या हा ब्लॅकमेल करणारा माणूस आहे. वेगवेगळ्या लोकांच्या कुंडल्या हाताशी घ्यायचं आणि त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि ब्लॅकमेल करून भाजपमध्ये या नाहीतर तुमच्या मागे ईडी लावीन अशा पद्धतीचा राजकारण या लोकांनी सुरू केला आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.