Supriya Sule on Sunil Tingare, पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. "पुण्यातील कल्याणी नगरला भयंकर अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्या अपघाताला जबाबदार असलेल्या लोकांना हा आमदार मदत करत होता. टिंगरे तू मतं कोणाच्या पक्षाच्या नावाने मागितली. माझ्या नावाने मतं मागितली आणि लोकांना सहाय्य करण्याऐवजी चुकीचे काम करणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. तुला सत्तेची मस्ती चढली आहे", अशी टीका शरद पवारांनी केला होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सुनील टिंगरेंवर जोरदार हल्ला चढवलाय. 


सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या? 


वडगाव शेरी वाल्यांनी काहीच बोलू नये. कुठल्या तोंडाने मतं मागणार आहात. तुमच्या दोन्ही हातावर खून आहेत, हा माझा आरोप आहे. दोन लोकांचा जीव गेलाय. त्यांच्या आईच्या दु:खाचा कधी विचार केलाय का? त्यांच्या आईला काय वाटतं असेल? त्यांच्या वडिलांना काय वाटतं असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटतं असेल? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.


आई-वडिल मध्यप्रदेशात राहतात, त्यांचे अश्रू पुसायला जाणार का?


पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांच्याकडे पोर्शे आहे, मोठी गाडी आहे, म्हणून त्यांची बाजू घेता. पैसे आहेत म्हणून त्यांच्या घरी जाणार आहात? असं नाही चालणार. मी स्वत: त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहे, त्या आईला न्याय देणार आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे आई-वडिल मध्यप्रदेशात राहतात, त्यांचे अश्रू पुसायला जाणार आहात का? तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता. ते पोलीस स्टेशन आहे, तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाही. मस्ती तुमच्या घरी दाखवायची, सर्वसामन्यांसमोर चालणार नाही. पोर्शे कार कोट्यवधींची गाडी आहे, कुठल्या पैशाने विकत घेतली हे देवालाच माहिती आहे. 


पोर्श कारने दोन युवकांचा खून झाला. त्यांची काय चूक होती? अशा प्रवृत्तीला घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीच्या लोकांवर आहे. तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागणार आहात. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही खूनी आहात. कधीतरी तुम्ही आईचं दु:ख आणि वेदना पाहा. एवढं करुन थांबले नाहीत. रक्त तपासणीमध्ये रक्त देखील बदललं आहे. या गोष्टीवर महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, असंही सुप्रिया सुळे म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Radhakrishna Vikhepatil : शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसता; राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल