अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना त्यांच्याच पक्षातील आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी जबर धक्का दिला आहे. प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची साथ सोडत आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनाचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वत: त्यांनी माहिती देत या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. तिसऱ्या आघाडीचं मेळघाटमध्ये काही ताळमेळ नाहीये, म्हणून कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मी प्रहारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याची प्रतिक्रिया स्वत: राजकुमार पटेल यांनी दिली आहे. येत्या 10 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धारणीला येणार आहेत. त्यांच्या उपस्थित मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आज धारणी येथे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घेत त्यांनी ही आपली भूमिका जाहीर केली आहे.  

  


बच्चू कडूंचा फोटो गायब, एकनाथ शिंदेंना स्थान 


प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडूंचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळालं होते. राजकुमार पटेल यांच्या ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडू यांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळला आहे. राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे आमदार आहेत. 6 ऑक्टोबरला कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीसाठी व्हायरल होत असलेल्या ग्राफिक्स बॅनरवर  प्रहारचं नाव आणि आमदार बच्चू कडूंचा फोटो गायब झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजकुमार पटेल यांना विधानसभेसाठी मोठा शब्द मिळाला असल्याची चर्चा होती. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसणार का? प्रहारमधून आमदार राजकुमार पटेल बाहेर पडणार का? या चर्चांना जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात उधाण आलं होते. दरम्यान आता स्वत: राजकुमार पटेल  यांनी याबाबत भाष्य करत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 


त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच घातक ठरणार- बच्चू कडू 


आमदार राजकुमार पटेल यांनी घेतलेल्या निर्णयावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, प्रत्येकाचा एक राजकीय स्वार्थ असतो. त्यामुळे जर राजकुमार पटेल हे जात  असतील तर त्याची आम्हाला परवा नाही. त्यांनी जातील तिथे सुखात राहावं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर आम्हाला एक घाव केला, तर आम्ही मात्र त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ. तसेच शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू. असे बच्चू कडू म्हणाले. त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही दहा खेडी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशी भूमिका आम्ही घेऊ. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ. आमचे काही पदाधिकारी आम्हाला आणखी सोडून जातील. काही राजकीय तर काही आर्थिक हेतूने सोडून जातील. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्याचं ऋण आमच्यात कायम आहे. पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच घातक ठरणार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.  


हे ही वाचा 


Ramraje Naik Nimbalkar : तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणाले....