Election 2024 गोंदिया : गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agarwal) यांनी 2019 मध्ये भाजपची (BJP) तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपासोबत बंडखोरी केली होती. तसेच त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा विजयही झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पक्षाशी बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केलं होतं. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ही निलंबनाची करावी मागे घेत त्यांचे पक्षातील निलंबन रद्द केले आहे. विनोद अग्रवाल यांच्यासोबत तेव्हा पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्‍यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.


विनोद अग्रवाल यांच्यासह अन्य 14 पदाधिकाऱ्यांचे ही निलंबन रद्द


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आता चांगलाच तयारीला लागल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची सर्वत्र मेट बांधताना दिसत आहे. अशातच गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजप पक्षातील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. दरम्यान, भाजपची उमेदवारी न मिळाल्याने विनोद अग्रवाल यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात त्यांनी विजय देखील मिळवला होता. मात्र, पक्षाशी बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांचे निलंबन केलं होतं. अशातच आता विनोद अग्रवाल यांचा निलंबन रद्द करण्यात आले आहे. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल असतील यावरही  जवळ जवळ शिक्कमोर्तब झाला आहे. 


निर्णयाचे स्वागत, मात्र आम्ही घेतलेली भूमिका योग्यच-विनोद अग्रवाल


या विषयी बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, माझं निलंबन रद्द केले आहे, या निर्णयाचे मी स्वागत करतो. हे निलंबन रद्द केल्यामुळे आम्ही जी घेतलेली भूमिका होती, ती योग्य होती हे सिद्ध झाले आहे. पक्षप्रवेशासंदर्भात आम्ही आमची भूमिका पुढे ठरवू. असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. मात्र, आज निलंबन रद्द केल्यामुळे विनोद अग्रवाल हेच आता गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहतील, हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 


हे ही वाचा