पुणे : आधी कुणी थोडं जरी बोललं, तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण गेल्या दहा महिन्यात मी घट्ट झाले. इतकं रडून झालं आहे की आता अश्रू येत नाही, असं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha Election 2024) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही वैचारिक लढाई आहे की, वैयक्तिक माझ्यासाठी नाही. पण, ज्या गलिच्छ पद्धतीने आज राजकारण चाललं आहे, त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
प्रेमाने घेण्यात जी मजा, ती ओरबाडून घेण्यात नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, यांना ते तिकीट कधीच नको होतं. तेव्हा जर साहेब म्हणाले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा, साहेब माझं चुकलं का? मला लोकसभेला का पाठवता? कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे, हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं ना, अरे मांगा होता, तो दिल खोलके तुमको देते. जे प्रेमाने घेण्यात जी मजा आहे ना, ती ओरबाडून घेण्यात मजा नाही. पण ही लढाई वेगळी आहे. कारण ही लढाई वैचारिक आहे की, वैयक्तिक माझ्यासाठी नाही. पण, ज्या गलिच्छ पद्धतीने आज राजकारण चाललं आहे, त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे.
माझ्या घरातली उणी-दुणी काढल्याशिवाय...
रोज काही ना काही बोलतात, जणू काय माझ्या घरातली उणी-दुणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाहीये, आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सिलेंडर कमी होणार आहे का? तुमच्या मुलांना नोकऱ्या लागणार आहेत काय? या देशातला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होणार आहे का? आरे ला कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर, खरं माहिती असलं, तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे, असंही त्यांनी म्हटल आहे.
इतकं रडून झालंय, आता अश्रूही येत नाही
आधी मी एवढी घट्ट नव्हते, पण दहा महिन्यात झाली आहे. एवढंस जरी बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण आता इतकं रडून झालं की, आता डोळ्यातून अश्रूही येत नाही आणि कुणासाठी रडायचं तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राची जाणीव नसेल तर कशासाठी रडायचं, असा उद्वीग्न सवालही सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
तुमच्यावर मी माझ्या घालवलेल्या या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे का? प्रत्येकाच्या अश्रूला यांनी काहीही बोलावं आणि रोहित मलाही गोष्ट खरी आहे की, इतक्या वेळा ते रोज सांगतात की, आमचं शाह आणि मोदी साहेबांशी फार चांगलं आहे. मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवावा. एकदा तरी दुधाच्या भावासाठी काही तरी करा. दुधाचा भाव काय? म्हशीचा एक लिटर दूध आमच्या गावातील शेतकऱ्याला 24 रुपयाला पडतं, तेच शहराच्या महिलांना विचारा 72 रुपये लिटर म्हशीचा दूध आहे का नाही? मला सांगा मग मधले पन्नास रुपये जातात कुठे? पण ही गोष्ट खरी आहे की, मधले 50 रुपये जातात कुठे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. रोज माझ्यावर आरोप होतात की, यांनी दहा वर्षात काय केलंच नाही. अहो माझं मराठीतलं तर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं एक अर्धा तास काढून, तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :