पुणे : राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी कऱ्हागावज गावाला भेट दिली. या गावात त्यांनी गावकऱ्यांशी आणि महिलांशी संवाद साधला. खरं सांगायाचं तर प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हाही जायची, या निवडणुकीत मला संधी मिळाली त्यामुळं जमलं नाही कारण तुम्ही सगळे जण आपले होता. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. माझ्या आणि दादांच्या लाडक्या बहिणींनी जो काय निर्णय दिला त्यातही खुश आहे. कारण शेवटी कशीही असली तरी संधी मिळाली आहे. राज्यसभेत म्हणजेच भारताच्या उच्च सभागृहात जाण्याचा सन्मान मला मिळाला, त्यात तुमच्या सर्वांचा वाटा नक्कीच आहे, त्यामुळं तुम्हा सर्वांचे आभार मानते, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. 


दादा जेव्हापासून राजकारणात आले, पहिल्या निवडणुकीपासून त्यांचा प्रचार करायची. घरातील कोणी उभं राहिलं की मी मात्र प्रचार करायला बारामतीमधील प्रत्येक तालुक्यात फिरायची, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. आपल्या गावात अनेकदा आलेली आहे, आता बऱ्याच जणांना आठवत नसेल, बऱ्याच नव्या सुना आहेत. बाहेर गावातील मंडळी इकडे तिकडे राहतात. त्याच्यामुळेच मी माहिती नव्हते तशी फारशी पण मागच्या चार दोन महिन्यात सगळ्यांना चांगली माहिती झाले. हरकत नाही, बारामतीकरांना नवी नव्हते, फक्त जास्तीची माहिती नव्हती. दादांची माहिती होती पण वहिनी काय करायची हे कधीच कुणाला माहिती नव्हतं, असंही त्यांनी म्हटलं.  


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना भावतेय : सुनेत्रा पवार


सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, तुमच्या सगळ्यांची भेट घ्यायची राहिली होती,म्हणून आज सगळीकडेच तालुक्यात फिरायचं ठरवलेलं आहे. आदरणीय दादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रभर महिलांचा प्रतिसाद मिळतोय. ज्यांच्या खात्यावर पैसे मिळालेले आहेत त्या खुश आहेत. महिला संसार करत असताना काटकसरीनं करत असतात. पैशाचं मोल ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच माहिती, इतरांना कळणार नाही त्याचं मोल काय आहे.दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्यानंतर माझ्या महिला भगिनींनी त्यांच्या अत्यावश्यक गरजा भागवल्या असतील. बचतगटाचे हप्ते भागवले असतील, मुलांच्या शिक्षणाची फी भरली असेल. हा पैसा तुमच्या हक्काचा असल्यानं त्याचं मोल वेगळं असणार आहे. म्हणून ही योजना तुम्हाला भावतेय,असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.


प्रत्येक गावात अनेक प्रश्न आहेत. मी राजकारणाच्या घरातील असली तरी राजकारणी नव्हते.प्रचाराच्या निमित्तानं फिरायचे. लोकसभेचा प्रचार करताना मी सगळ्या गावांमध्ये, तालुक्यात फिरले. तेव्हा बारामती बाहेरच्या तालुक्यांची अवस्था काय आहे जवळून बघितलं. आपल्याला एक गोष्ट नसली की अधिकारानं म्हणतो, बाहेरच्या तालुक्यात, पुण्याच्या जवळच्या तालुक्यात अतिशय वेगळी स्थिती आहे. आपल्या  प्रत्येक गावात कोटीवर निधी आहे. जलजीवन मिशनचं काम सुरु आहे. तुमच्या अडचणी दूर होणार आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.


महिलांनी वाचला तक्रारींचा पाढा


राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी काल बारामती तालुक्यातल्या गावांत गावभेट दौरा केला. या दौऱ्या दरम्यान क-हावागज येथील महिलांनी  सुनेत्रा पवार यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला.  गावात 34 बचत गट कार्यरत असताना महिला अस्मिता भवन नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार केली. याशिवाय महिलांच्या हाताला रोजगार द्यावा तक्रार महिलांनी केली. याशिवाय बारामती शहराच्या जवळ असताना गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ग्रामपंचायत मात्र याकडे दुर्लक्ष करतेय अशा अनेक तक्रारींचा पाढा सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडला. सुनेत्रा पवार यांनी या समस्यांकडे लक्ष वेधून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


इतर बातम्या : 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली


Ajit Pawar: मोठी बातमी : बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती : अजित पवार