अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी मिळालेले अनेक नेते प्रचारात गुंतले आहेत. लोकांच्या भेटीगाठी, विविध घटकांशी चर्चा करत, मतांची बेगमी केली जात आहे. अहमदनगर दक्षिणमध्ये मात्र सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी सामोपचारातून समृद्धीचा मार्ग जोपासल्याचं दिसतंय. कधी काळी ज्यांच्याविरोधात दंड थोपटले त्यांना मदतीला घेत, तर जे नाराज झाले असतील त्यांची माफी मागत सुजय विखेंनी विजयासाठी प्रयत्न सुरू केलेत.


संग्राम जगतापांशी जुळवून घेतलं


अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र मविआचा उमेदवारच अद्याप निश्चित झालेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभेसाठी दोन युवांची लढत लक्षवेधी ठरली होती. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत हेच युवा नेते सोबत दिसणार आहेत. कारण गेल्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकलेले सुजय विखे आणि संग्राम जगताप (Sangram Jagtap) यंदा मात्र एकत्रितपणे महायुतीचा प्रचार करताना दिसत आहेत.


गेल्या वेळी पराभव, आता प्रचार


अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्षवेधी ठरत असते. मागील लोकसभा निवडणुकीत दोन युवा उमेदवार, म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यात लढत झाली. त्यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा 2,81,474 मतांनी पराभव केला. 


मात्र गेल्या काही काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पक्ष फुटले. कुणीही विचार केला नसेल अशा पद्धतीने राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीत एकत्रित आले. त्यामुळे जे उमेदवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले तेच यंदाच्या निवडणूक एकत्रित प्रचार करताना दिसणार आहेत.


निवडणूक झाल्यानंतर जुळवून घेतलं


गेल्या लोकसभा निवडणूकीवेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती, तरीदेखील आम्ही पातळी सोडून प्रचार केला नाही. त्यामुळे भविष्यात बदलल्या राजकीय परिस्थितीत आम्हाला दोघांना जुळवून घेण्यात अडचणी आली नसल्याचे सुजय विखे आणि संग्राम जगताप सांगत आहेत. खरं तर निवडणूक होताच संग्राम जगताप आणि सुजय विखे यांनी नगर शहरातील अनेक कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावली. 


अजित पवार देतील तो आदेश पाळू


विशेष म्हणजे ज्यावेळी आ. संग्राम जगताप मविआमध्ये होते तेव्हा नगर शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम करण्यासाठी दोघांनी हातात हात घालून काम केले. विरोधात असताना देखील त्यांनी अनेक कामे- कार्यक्रम सोबत केल्याने त्यांच्यावर टीका देखील झाली. पण राजकीय परिस्थिती बदलली आणि संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आले. त्यामुळे महायुतीत एकत्रित असल्याने आमचे नेते अजित पवार जो आदेश देतील तशा पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ आणि सुजय विखेंसाठी काम करू असं संग्राम जगताप सांगतात.


ही बातमी वाचा :