Sujay Vikhe and Ram Shinde : अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने (BJP) देखील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (Ahmednagar Lok Sabha constituency) निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत भाजप उमेदवार खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) माफी मागितली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सुजय विखेंनी माफी मागितली, पण नेमकी कुणाची नगरच्या जनतेची की राम शिंदेंची (Ram Shinde) अशा चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली आहे.
भाजप उमेदवार सुजय विखेंनी मागितली माफी
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक नगरमध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये उमेदवारीसाठी प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आमदार राम शिंदे यांच्यासह विखे पिता- पुत्रावर नाराज असलेले पदाधिकारी देखील उपस्थित होते. उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सुजय विखे यांचा चौधरी आणि राम शिंदे यांनी सत्कार केला. या सत्काराला उत्तर देत असताना सुजय विखे यांनी मागील पाच वर्षांमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला असेल तर, मी जाहीरपणे माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.
सुजय विखेंनी माफी मागितली, पण नेमकी कुणाची?
सुजय विखेंना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजप आमदार राम शिंदे हे सतत लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे म्हणत होते, तर कधी राम शिंदे हे संभाव्य विरोधी उमेदवार निलेश लंके यांच्या स्टेजवर देखील पाहायला मिळाले. अनेक वेळेला सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे सुजय विखेंनी येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून राम शिंदेंची अप्रत्यक्षपणे माफी मागितल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. दरम्यान, याबाबत बोलताना आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे कशाबद्दल माफी मागत आहेत हे त्यांनाच माहिती आहे. पाच वर्षात ज्या चुका केल्या आहेत, त्या जाणीवपूर्वक केल्या आहेत की नाही हे देखील त्यांनाच माहित आहे, असं म्हटलं आहे.
महायुतीत समन्वयाचा अभाव?
या बैठकीत आणखी एक मुद्दा लक्षवेधी ठरला तो म्हणजे महायुती सरकारमध्ये अनेक आमदार असे होते की, त्यांनी अजित पवारांच्या माध्यमातून निधी आणला आणि आता ते दुसरीकडे म्हणजे शरद पवारांकडे जाऊन फोटो काढत आहे आणि "आम्ही तुमच्याच सोबत असल्याचे म्हणत आहेत" असं म्हणत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली. यासोबतच महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांची नियुक्ती करून समन्वय करणे, गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
तर भाजप उमेदवार सुजय विखेंनी महायुतीत समन्वय आहे, मात्र महायुतीतील इतर पक्षांनी देखील मेळावे घ्यावेत म्हणजे त्यांच्या स्टेजवर कोण-कोण उपस्थित राहतं त्यांना सोबत घेऊन पुढे चांगले काम करता येईल, असं म्हटलं आहे. एकूणच भाजपने दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सुजय विखेंनी त्यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांची माफी देखील मागितली आहे. मात्र हे नेते सुजय विखेंना माफ करून लोकसभेत मदत करणार का? महायुतीतील सर्वच पक्षांचा समन्वय होणार का? हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.