नाशिक : महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यात वादाची ठिणगी पडलीय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नांदगाव-मनमाड मतदारसंघाचा उल्लेख केला होता. नेमक्या याच उल्लेखानंतर समीर भुजबळ नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळं या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे संतापले आहेत. सुहास कांदे यांनी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याऐवजी थेट छगन भुजबळ यांनीच उभं राहावं असं आव्हान दिलं आहे. भुजबळ यांना निवडणुकीत पाडू शकतो, असं चॅलेंज देखील कांदे यांनी दिलं.   


शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलं आहे. समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, मी त्यांच्यासमोर उमेदवारी करायला तयार आहे, असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास मी कधीही, कुठेही तयार आहे. निवडणुकीत मी छगन भुजबळांना पाडू शकतो, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.


येवल्यातून लढण्याची तयारी 


पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास येवल्यातून देखील भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं देखील सुहास कांदे म्हणाले. येवल्यातून निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी असल्याचं म्हणत सुहास कांदे यांनी भुजबळांना थेट आव्हान दिलं आहे.


समीर भुजबळांची इच्छा पूर्ण करणार


सुहास कांदे यांनी   पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे आहेत. छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी, असं आव्हान दिलं. मतदारसंघात भुजबळ पाच वर्ष दिसले नाही मात्र आठ दिवसांपासून वेगवेगळे कार्यक्रम घेतायत. पंकज भुजबळ यांची इच्छा पूर्ण झाली आता समीर भुजबळांची देखील इच्छा पूर्ण करण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले.


जनता हुशार, छगन भुजबळ यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत भुजबळ यांनी काय केलं हे सर्वांना माहिती, असल्याचं देखील सुहास कांदे  म्हणाले.


छगन भुजबळ काय म्हणालेले?


नाशिक जिल्ह्यासह नांदगाव - मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा, असं छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना सदिच्छा देताना म्हटलं होतं. याच मुद्यावरुन सुहास कांदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.


इतर बातम्या :


शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार


Eknath Shinde : सगळ्यात जास्त मताधिक्य द्या, प्रकाश आबिटकरांना मंत्री करतो, एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा