Sudhir Mungantiwar : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. अशातच भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामध्ये, माजी मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे आहेत. अशातच भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहे का? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे नागपुरात उपस्थीत असून देखील मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याची माहिती पुढे आली आहे. मंत्री मंडळ विस्तारानंतर एकीकडे महायुतीला अनेक नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू असताना त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. 


मौनम्  सर्वार्थ साधनम्  


दरम्यान, याच मुद्यांवर  सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी नाराज असण्याचे कारण नाही. पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली त्यांचे पालन करणे, हेच मी आजवर करत आलो. मात्र आज विधिमंडळाचे फार काही काम नसल्याने मी गैरहजर राहिलो. किंबहुना मला याची जाणीव आहे की मी तेथे हजार राहिल्याने अनेक प्रश्न कारण नसताना मला विचारले जाऊ शकतील, त्यामुळे या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा मौनं सर्वार्थ साधनम् प्रमाणे शांत राहणं मी पसंत केल्याची स्पष्टोक्ती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मी कुठेही नाराज नाही. गेली 15 वर्ष आम्ही विरोधात होतो. जी जबाबदारी मला देण्यात आली ती निष्ठेने मी पार पाडली आणि पुढेही पाडेल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


मला मंत्रीपद मिळणार नाही असं कधीच सांगितलं नाही-  सुधीर मुनगंटीवार


पक्षाने कायम प्रेम दिलं मी ही जीव ओतून काम केलं. शपथविधीपूर्वी मला मंत्रीपद देणार असे सांगण्यात आले होते.  कदाचित नवी जबाबदारी देण्यात येणार असेल म्हणून ते झाले नसावं.  मला मंत्रीपद मिळणार नाही असं कधीच सांगितले नाही. 1995 मी लोकांमधून निवडून येत प्रतिनिधीत्व करत आहे. मला प्रमोद महाजांनाचे एक वाक्य फार आवडतं, पावला पावलांवर मना विरोधात घडत असताना जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी कायम जपले आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझं बोलणं होत होते, मात्र त्यांनी याबाबत कधी जाणवू दिलं नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर पुढील माझी राजकीय दिशा म्हणजे 'जीना यहाँ मरना यहाँ' असल्याचेही ते म्हणाले. 


 



 


हे ही वाचा