मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकांमध्येही चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकींवेळी ननंद विरुद्ध भावजय असा सामना बारामती मतदारसंघात अत्यंत लक्षवेधी झाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीला काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra pawar) निवडणुकीच्या रणांगणात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्रचारालाही वेग आला आहे. युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचाराचा नारळ फोडला. लेकासाठी बाप मैदानात उतरला असून भावाविरुद्ध दंड थोडपले आहेत. त्यामुळे, बारामतीत निवडणुकीमुळे भावाची भावकी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुलगा युगेंद्र पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वडील बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी आज बारामतीच्या काशी-विश्वेश्वर मंदिरामधून नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती विधानसभेकरिता उद्या सोमवार रोजी यूगेंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, त्या आधीच श्रीनिवास पवार यांनी युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात बारामीत पाहायला मिळणार आहेत.


युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल


महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाची पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडं आव्हान दिलंय. सर्वाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 25 गावांत प्यायला पाणी नाही. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसेच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे, असे म्हणत युगेंद्र पवारांनी उमेदवारी जाही होताच नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली.  


बारामतीत जानकरांचेही उमेदवार


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत रामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात संदीप चोपडेंना तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्याविरोधात  विकास मासाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.