SP Pravin Mundhe on Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज दुपारी (दि.4)सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंत्री गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान गु्न्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अनिल देशमुख म्हणाले. मात्र, आता तत्कालीन SP प्रवीण मुंढे यांच्या जबाबात धक्कादायक खुलासे पाहायला मिळत आहेत.
तत्कालीन SP प्रवीण मुंढे यांच्या जबाबात धक्कादायक खुलासे
SP प्रवीण मुंढे सांगतात, विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मला फोन केला होता. अनिल देशमुखांनी सांगितले की, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील. त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबाबत सांगितले. अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा, असे सांगितले. मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले. कारण, ते सांगत असलेला घटनाक्रम हा जळगाव हद्दीतील नव्हता पण, तसे करण्यास तक्रारदाराने नकार दिला.
एका एफआयआरसाठी 3 वेळा फोन का करावा लागतो? असं म्हणत देशमुखांनी धमकावलं
पुढे बोलताना प्रवीण मुंढे सांगतात, पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवितो असे सांगितले. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांचा फोन यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी, पोलिस महासंचालक यांना सांगितला. पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी यावेळी मला धमकावलं. एका एफआयआरसाठी 3 वेळा फोन का करावा लागतो, असे विचारले. सातत्याने गृहमंत्री धमकावित असल्याने अखेर गुन्हा दाखल केला. कोणताही घाई नसताना झिरो एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला. शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता, असा धक्कादायक खुलासा प्रवीण मुंढे यांनी केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्री गिरीश महाजन यांनी मला मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या