South Mumbai Lok Sabha Constituency: महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेची जागा (South Mumbai Lok Sabha Constituency) ठाकरेंना सुटली असून ठाकरेंनी अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याचपार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरुन मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघांचा तिढा पुढच्या दोन दिवसांत सुटणार असल्याची माहिती मिळत आहे. 


सागर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, पियूष गोयल देखील उपस्थित होते.  इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघांनाही मतदार संघात काम सुरू ठेवण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत दक्षिण मुंबई मतदारसंघाचा कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होणार आहे. 


दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा इच्छुक आहे. याचपार्श्वभूमीवर दोघंही मतदारसंघात भेटीगाठी घेत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण महायुतीत भाजप आणि शिवसेना दोनही पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असे भाजपचे मत आहे. 


दक्षिण मुंबईसाठी भाजपचा हट्ट का? 


-विधानसभेत युती नसताना झालेल्या स्वतंत्र लढतीत भाजपने शिवसेनेहून अधिक मते घेतली होती.
-दक्षिण मुंबईत सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केवळ एक आमदार असून, दोन आमदार ठाकरे गटाकडे आहेत.
-याउलट भाजपचे दोन आमदार कार्यरत आहेत.
-गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा जबरदस्त मोदी लाट दिसेल, त्यामुळे भाजपसाठी दक्षिण मुंबईत पोषक वातावरण असेल असे भाजपचे मत आहे.
-विशेषतः महिला व तरूणांवर असलेले नरेंद्र मोदींचे गारुड पाहता धनुष्यबाणाहून अधिक मते कमळाला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.


South Mumbai Loksabha Constituency : कोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश? 


विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा या मतदारसंघांचा समावेश होते. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. तर, कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे राहुल नार्वेकर करत असून ते विधानसभेचे अध्यक्षही आहेत. भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या होत्या, त्या आता शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत. शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत.


संबंधित बातमी:


 श्रीमंताचं मलबार हिल ते कष्टकऱ्यांचं गिरणगाव, इथेच ग्रामदेवतेचं स्थान; मराठी मतांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईत गुलाल कोण उधळणार?