Narasayya Adam Met Sushilkumar Shinde : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) जाहीर होण्यापूर्वी सोलापुरात (Solapur) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माकपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची भेट घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची चर्चा आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीत  माकपाला सोडण्याची आडम यांची मागणी आहे. दरम्यान, सुशीलकुमार शिंदेनी महाविकास आघाडीतून सोलापूर मध्यची जागा माकपला सोडण्याची हमी दिल्याचा दावा आडम यांनी केलाय. 


सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे या 3 वेळा आमदार राहिल्या आहेत. तर नरसय्या आडम देखील याचं मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतात. प्रणिती शिंदे या  लोकसभेत निवडून गेल्यानं सोलापूर शहर मध्यची जागा माकपला सोडण्यात यावी अशी  मागणी नरसय्या आडम यांनी केली आहे.  


लोकसभा निवडणुकीत नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंचे पारंपरिक विरोधक असलेल्या नरसय्या आडम यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या बदल्यात आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा 74,196 मतांनी पराभव केला आहे. लोकसभेच्या विजयात प्रणिती शिंदे यांना सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात 796 मतांची आघाडी मिळाली होती. या ठिकाणी आता नरसय्या आडम मास्तर इच्छुक असून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. 


नरसय्या आडम हे तीन वेळा आमदार


कॉम्रेड नरसय्या आडम हे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 1978, 1995 आणि 2004 च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता. कामगारांचा नेता अशी ओळख असलेला नरसय्या आडम मास्तर यांचा 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. जाई जुई विचारमंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रदार्पण करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. त्यानंतर झालेल्या 2014 आणि 19 च्या निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांचा पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात.


महत्वाच्या बातम्या:


लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण?