Maharashtra Legislative Council Election 2024 मुंबई: आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत(Maharashtra Legislative Council Election)क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांचे भाडे सध्या 15 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे एवढा खर्च कोण करणार?, असा सवाल उपस्थित होत आहे.  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. 


भाजपाचे आमदार कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये-


भाजपने आपल्या आमदारांची सारी व्यवस्था ही कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे. या प्रेसिडेंट हॉटेलमधील एका खोलीचे किमान भाडे हे 15 हजार रुपये आहे.


शिंदे गटाचे आमदार कुठे?


शिवसेना शिंदे गटाने आपल्या आमदारांची व्यवस्था वांद्रे येथील 'ताज लॅण्डस एंड' या हॉटेलात ठेवली आहे. अंबानी पुत्राचा विवाह वांद्रे-कुर्ला संकुलात असल्याने विमानतळ परिसर तसेच वांद्रे परिसरातील सर्व पंचतारांकित हॉटेलच्या दरात वाढ झाली आहे. 'ताज लॅण्डस एंड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये 15 ते 25 हजारांच्या दरम्यान भाडे आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवार व शनिवारचे दर ते 30 हजारांपेक्षा अधिक आहेत. 


ठाकरे गटाचे आमदार 


शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना परळच्या 'आयटीसी ग्रॅण्ड'मध्ये ठेवण्यात येणार असून तेथील भाडे हे 12 ते 15 हजारांच्या दरम्यान एका सूटचे भाडे आहे.


महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार-


विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. 


पक्षीय बलाबल काय?, जाणून घ्या-


महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे.  प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. 11 MLC चा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.


संबंधित बातमी:


आमदारांमध्ये खेळीमेळीचे वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न, सर्वजण एकाच मजल्यावर, आदित्य ठाकरेही हॉटेलमध्ये राहणार, निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा खास प्लॅन