सोलापूर : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,


सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच प्रकरणी शिवसिध्द बुळा याचा बनावट दाखला तयार करण्यात हात? असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यामुळेचं सोलापूर शहर गुन्हे शाखेने बुळा यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


काय आहे प्रकरण?
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र, हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि तो निकाल 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 व 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.


कोण आहेत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य?
सोलापूर शहराचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं आहे. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करुन ते सामाजिक कार्यात सहभागी झाले. सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मितीही त्यांनी केलीय.