परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांवर, आमदारांवर ते हल्लाबोल करत आहेत. कागल येथे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी भाषण करताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर, महायुती सरकारच्या धोरणावर टीका करताना, राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे, असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्याचे कृषिमंत्री आणि कधीकाळी शरद पवारांचे विश्वासू साथीदार असलेल्या धनंजय मुंडेंना परभणी दौऱ्यात यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना त्यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेला सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला.  


कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) सध्या मराठवाड्यातील (Marathwada) नुकसानग्रस्त व पूरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करत आहेत. येथील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कोल्हापूर येथील जाहीर सभेत भाषण करताना शरद पवारांनी (Sharad pawar) महायुती (mahayuti) सरकारवर टीका केली. तसेच, हे महायुतीचे सरकार आपल्याला राज्यातून घालवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले होते. याच अनुषंगाने धनंजय मुंडेंना परभणी दौऱ्यात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, त्यांना हे माहितीच आहे की, महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम हे सरकार करत आहे, मग हे योजनांचा थेट लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडेनी विचारला. 


सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, किंवा शेतकऱ्यांचा पिक विमा असेल, शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल, तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे, अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला का घालवायचे आहे, असा सवालच धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना विचारला आहे. दरम्यान, यापूर्वीही धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.  


योजना महायुतीची, श्रेयवादाची लढाई नाही - 


सध्या लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे  दिसून येते. त्यावर बोलताना, योजना महायुतीचीच असून पक्षाकडून प्रचार करताना पक्षाच्या चौकटीत बसून प्रचार केला जात असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीत  मुख्यमंत्र्यांच्या नावाला वगळल्याप्रकरणी त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुतीचीच आहे, मात्र जेव्हा महायुतीतील घटक पक्ष पक्षाचा प्रचार करतात तेव्हा पक्षाच्या चौकटीत बसून योजनेबद्दल प्रचार केला जातोय. याबद्दल दुसरं कुठलंही मत काढण्याचे आवश्यकता नाही, असे मुंडेंनी स्पष्ट केले.