Chhatrapati Sambhajinagar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, त्या अनुषंगाने अनेक दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच यावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेकदा चर्चा रंगल्याचे दिसून येत असताना मविआकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा संदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही, असं म्हटलं आहे.


मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावरती होईल असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलेलं आहे. तर याच विषयी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही भाष्य करत आमचा हेतू हा महाराष्ट्र द्वेष्ट भाजप सरकार  यांना पळवण्याचा प्रथम प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


जागा वाटपामध्ये रस्सीखेच ही होणारच, मात्र...      


केवळ मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीमध्ये कोणीही निवडणूक लढवत नाही आहे. आम्हाला लढायचं एवढ्यासाठीच आहे कारण की सध्याचं राज्यातलं सरकार हे महाराष्ट्र द्वेष्ट आहे. त्यांना प्रथम राज्यातून हद्दपार करायचे आहे. किंबहुना जागा वाटपामध्ये रस्सीखेच ही होणारच. त्यात असं कुणालाही वाटून घेण्याचे कारण नाही की काहीतरी तुटत आहे.  खेचातानी ही झालीच पाहिजे. कारण प्रत्येकाची राज्यात ताकद आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने सीट मागितलीच पाहिजे. असेही आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी मधले चित्र स्पष्ट आहे.


आमच्यात आपआपसात कुठलीही लढाई नसून महाराष्ट्राच्या हिताच्या आणि राज्याच्या स्वाभिमानासाठीची आमची लढाई आहे. आमचा हेतू हाच आहे जे महाराष्ट्र द्वेष्ट आहेत. त्यांना पळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या घडीला 256 एकर मीठ आगाराची जागा ही अदानीच्या  गळ्यात टाकण्याचं काम केलं जात आहे, दुसरीकडे मुंबई विकायचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आमच्या पहिलं उद्देश हेच आहे की या भाजप सरकारला राज्यातून घालवायचे असल्याचेही ते म्हणाले.  


शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, आम्ही राजकीय मागणी करणार नाही- आदित्य ठाकरे  


राज्यासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याच अनुषंगाने मी हा पाहणी दौरा करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता पुढे सणवार आहेत. त्यामुळे सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. गेल्यावेळी  मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलो असताना असं वाटत होतं चांगला दमदार पाऊस झाला आहे. मात्र सध्याचे चित्र हे अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याचे आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना वेळीच योग्य ती मदत करणे गरजेचे आहे.  त्या अनुषंगाने आम्ही आज ही पाहणी करत आहे. 


या पाहणी केल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सरकारकडे मागणी करणार आहोत त्यात कुठलेही राजकारण न आणता आम्ही मागणी करणार आहोत. ही मागणी राजकीय मागणी नसणार आहे.  मात्र आगामी काळात येणारा गणेशोत्सव, नवरात्र आणि इतर सण लक्षात घेता सरकारने मदत करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रशासन आपले काम चोखपणे निभावत असतं,  यासंदर्भात पंचनामे देखील होत असतात. गेल्यावेळी देखील या अनुषंगाने पंचनामे झालेत. मात्र, सरकारकडून कुणाच्या नावावर पाच रुपये, कुणाच्या नावे पन्नास रुपये, अशी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात आलेली बघायला मिळाली आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.


राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा हा त्यांचा वैयक्तिक 


काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल अशी दाट शक्यता आहे, यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महाविकास आघाडीकडून जेव्हा केव्हा प्रचाराचा नारळ वाढवला जाईल, तेव्हा त्याबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल.  मात्र जेव्हा अधिकृत  महाविकास आघाडीची सभा होईल त्याचवेळी आम्ही याबद्दल कळवू. सध्याचा राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा हा त्यांचा वैयक्तिक पक्षाचा दौरा असल्याची प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांनी दिली.


राज्यात सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून याचा फटका सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांना बसतो आहे. यावर राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी  तात्काळ तोडगा काढावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या या पूर्वापार चालत आलेल्या आहेत, त्यावर सरकारने मध्यम मार्ग काढावा आणि हा संप संपुष्टात आणावा. कधीकाळी भाजपचेच काही लोक या संपामध्ये आग लावण्याचे काम करत होते. ते लोक आज कुठे आहेत? असा सवालही उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.


हे ही वाचा