Shivsena Uddhav Thackeray, Kokan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhansabha Election Result) निकाल लागला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) पराभव झाला. बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणात (Kokan) झालेल्या या पराभवानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हादरून गेले. कारणमीमांसा करण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला. आरोप - प्रत्यारोप रंगले. राजीनामे सादर केले गेले. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निभावलेली भूमिका आणि त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईसाठीचे ठराव केले गेले. अशाच वेळी माजी खासदार, ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बुधवारी म्हणजेच 04 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. लांजा, राजापूर इथं चर्चा केल्यानंतर राऊत दुपारी अडीचच्या सुमारास रत्नागिरीतील आपल्या कार्यालयात दाखल झाले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली. बैठकीत आरोप - प्रत्यारोप झाले. शब्दाला शब्द वाढत गेला. अशावेळी काही पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदावर काम करणाऱ्या एका मुख्य पदाधिकाऱ्यावर आक्षेप घेत त्याच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल मारली.
ठाकरेंचे शिवसैनिक देवाच्या दरबारात निष्ठा सिद्ध करणार
विनायक राऊत यांच्या जवळची व्यक्ती म्हणून देखील या पदाधिकाऱ्याची ओळख आहे. राऊतांच्या समोर सारा प्रकार सुरू होता. त्यानंतर निष्ठेच्या आणभाका केल्या गेल्या. निष्ठा सिद्ध करण्यासाठी थेट देवाच्या गाभाऱ्यात उभं राहून ती सिद्ध करण्याची गळ घातली गेली. त्यानुसार आता येत्या रविवारी म्हणजेच 8 डिसेंबर 2024 रोजी हातीस येथील पीर बाबर शेख यांच्या दर्ग्यात उपस्थित राहून निष्ठेची शपथ घेतली जाणार आहे. हा दर्गा हिंदू - मुस्लिमचं ऐक्याचं प्रतिक म्हणून प्रसिद्ध आहे. रविवारी जी व्यक्ती या ठिकाणी हजर राहणार नाही. जी व्यक्ती बाबर शेख यांच्या दर्ग्यात उपस्थित राहणार नाही. त्यानं पक्षविरोधी काम केलं असा त्याचा अर्थ लावला जाणार आहे. एका पदाधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या किंवा नाव कळू न देण्याच्या अटीवर ही माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे.
कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेत आगामी काळात मोठ्या उलथापालथींची देखील शक्यता
त्यामुळे कोकणात ठाकरेंच्या निष्ठावंतांच्या निष्ठेचा न्याय होणार देवाच्या दरबारात होणार आहे. देवाच्या गाभाऱ्यात उपस्थित राहून निवडणुकीत केलेल्या कामाबाबत घेतली जाणार शपथ घेतली जाणार आहे. रविवारी पीर बाबर शेख यांच्या दर्ग्यात शपथ घेऊन कार्यकर्ते निष्ठा सिद्ध करणार आहेत. विनायक राऊत यांच्यासमोर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप झाल्यानंतर आता निष्ठावंतांच्या निष्ठेचा न्याय देवाच्या दरबारात पोहोचलाय. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद समोर येऊ लागली आहे. आगामी काळात मोठ्या उलथापालथींची देखील शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे तर, काही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. लांजा, राजापूर, रत्नागिरीमधील कार्यकर्त्यांची पराभनंतरची खदखद बाहेर येऊ लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या