Devendra Fadnavis To Take Oath as Maharashtra CM: अपेक्षेप्रमाणेच भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) झाले. उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री आहेत.


लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला, ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचे सूतोवाच जवळच्या मित्रांकडे केले होते. मात्र, देवेंद्र असे काही करतील असे कोणालाही वाटत नव्हते, मात्र दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आणि खळबळ माजवली. केवळ भाजपच नव्हे तर मित्र पक्षांच्या आमदार नेत्यांनीही फडणवीसांनी राजीनामा देऊ नये असा आग्रह केला. भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनीही देवेंद्रजींची राजीनाम्याची इच्छा पूर्ण केली नाही, उलट लोकसभेला झाले ते झाले, आता विधानसभेला काही तरी करून दाखवा, असा संदेश देवेंद्र फडणवीसांना दिला आणि फडणवीस कामाला लागले. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यास फडणवीस तयार झाले आणि त्यांनी दिवस-रात्र एक करीत, सगळ्यांना एकत्र घेऊन अविश्वसनीय असा विजय प्राप्त केला. महायुतीला मिळालेल्या विजयाने महाविकास आघाडी सरकार चकित झाले आणि ईव्हीएमवर खापर फोडून स्वतःची समजूत काढत राहिले.


महायुतीला विजय का मिळाला आणि त्याचे शिल्पकार कोण हे विरोधी पक्षांना चांगले ठाऊक होते, त्यामुळे विधानसभा निकालानंतर फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून देव पाण्यात ठेऊन बसले होते.


एवढेच नव्हे तर फडणवीसांचा पत्ता कट होणार, त्यांच्याऐवजी मराठा नेत्याला मुख्यमंत्री करणार, शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा पुड्याही सोडू लागले होते. काहीही करून महायुतीत वाद व्हावा, असा विरोधकांचा प्रयत्न होता, परंतु त्यांनी फडणवीसांना पूर्णपणे ओळखले नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. फडणवीसांनी पक्षातील नेत्यांबरोबरच महायुतीच्या नेत्यांनाही विश्वासात घेतले, त्यांच्याशी सतत चर्चा करीत राहिले. सत्ता स्थापन करण्याची आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर काय-काय करायचे याची योजना आखत राहिले, आपणच मुख्यमंत्री होणार याबाबत देवेंद्र फडणवीसांच्या मनात दुमत नव्हते.


याचे एक कारण सांगतो. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत  अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने मला दिली होती. एकनाथ शिंदे यांचीही यावेळी अमित शाह यांनी समजूत काढली होती. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री पदावर येत असतील तर तुम्हालाही असे करण्यास हरकत नाही, तुमचे नुकसान तर होणार नाहीच, असेही अमित शाहांनी त्यावेळी म्हटल्याचे सांगितले जाते