मुंबई: राज्यात आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.
तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर शिंदेंचं नाव नाही
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबतचा संभ्रम यामुळे कायम असल्याचं चित्र आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव दिसत नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रण पत्रिकेवरती केवळ देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवरती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचं नाव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या सरकारमध्ये कोणत्या पदावर दिसणार याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. आज सकाळपर्यंत समोर आलेल्या बातम्यांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली असून ते देखील शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र, आता समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून हा संभ्रम कायम असल्याचा दिसून येत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं वर्तवला जात होतं, मात्र या पत्रिका समोर आल्यानंतर आता संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबी रंगाची पत्रिका काढली आहे, त्यावरती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा नाव आहे. तर शिवसेनेने भगवा रंगाची पत्रिका छापली आहे. त्यावरती केवळ देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. शिवसेनेच्या पत्रिकेवरती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा उल्लेख आहे. तर अजित पवारांच्या पत्रिकेवरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. याबाबत पक्षांकडे विचारणा केल्यानंतर एकनाथ शिंदे जर शपथ घेणार असतील तर त्यांचा पत्रिकेवर नाव का नाही यावर कारण देताना त्यांनी सांगितलं, की या पत्रिका आधी छापण्यात आल्या होत्या. काल दुपारी जेव्हा तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली तोपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम होता, तत्पूर्वी या पत्रिका छापण्यात आल्या होत्या अशी माहिती आहे, त्यामुळे संभ्रम झाला आहे, असं पक्षांकडून सांगण्यात आलं आहे.
तर भाजपच्या पत्रिकेवरती केवळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव देण्यात आल्याचं दिसून येते, त्यावरती शिंदे यांचे नाव लिहिण्यात आलेलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे घेणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे. तर एबीपी माझा ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शपथविधीसाठी केवळ तीन ते चार तास राहिले आहेत. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बाबत सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पत्रिकामधून मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव गायब असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून हे नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नावाबाबत पक्षांकडून स्पष्टीकरण
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, याआधीच छापलेल्या पत्रिका आहेत. एकनाथ शिंदेंची काल संध्याकाळ पर्यंत बोलणी सुरु होती.