मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी (Shivsena UBT Candidate List) जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना ठाकरे गटानं त्यांच्यासोबत असलेल्या सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अरविंद सावंत,विनायक राऊत आणि राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा होता.सांगलीत ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सांगलीच्या जागेवर तिढा असताना शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळं आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. एकीकडे काँग्रेस नेते दिल्लीत सांगलीच्या जागेसाठी सोनिया गांधी यांची भेट घेणार असतानाच सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
ठाकरेंनी शब्द खरा केला
चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. सांगलीतून चंद्रहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती. सांगलीत सभा घेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
सांगलीत तिरंगी लढत?
सांगली मध्ये भाजपनं विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे. संजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून असतील. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आला नाहीतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी काही समर्थकांची भूमिका आहे. शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरुन तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत देखील तिरंगी लढत झाली होती. तिरंगी लढतीत संजयकाका पाटील यांचा विजय झाला होता. संजयकाका पाटील यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढले होते.तर, वंचितकडून गोपीचंद पडळकर लढले होते. विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानं संजयकाका पाटील विजयी झाले होते.
संबंधित बातम्या :