Supriya Sule vs Sunetra Pawar : पुणे : 'बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती' (Baramati Lok Sabha Constituency) हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण. काकांचीसाथ सोडून अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची (BJP) साथ दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात कोण लढणार? असा प्रश्न निर्माण झाला. आणि चर्चा सुरू झाली खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचीच वहिनी आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढणार असल्याची. बारामतीसाठी महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराचं नाव जरी जाहीर झालं नसलं, तरी राष्ट्रवादीनं (NCP) लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर बारामतीतील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर पहिल्यांदाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची वहिनी सुनेत्रा पवार एकत्र येणार आहेत.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजकीय वर्तुळात नणंद-भावजयमध्ये रंगणाऱ्या या निवडणुकीच्या चुरशीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा राजकीय वर्तुळात या नणंद-भावजयची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, लवकरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज यानिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच मंचावर
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीज साजरी केली जाते. गेली अनेक वर्ष सुप्रिया सुळे तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावतात. यावर्षी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीजेसाठी भाविक एकत्र येत असतात. याचंच औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आज (बुधवारी) सकाळी सव्वाअकरा वाजता सुनेत्रा पवार तर अकरा वाजता सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील, असं त्यांच्या नियोजित दौऱ्यात वेळ ठेवण्यात आली आहे. याआधी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीतील जळोची येथे एका मंदिरात समोरासमोर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी एकमेकांनी मिठी मारली होती.
बारामती मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात
बारामती लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा समाजाचा एक उमेदवार देणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. बारामती शहरातील जिजाऊ भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक झाली. त्यामध्ये आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मराठा उमेदवार देणार असल्याचा एकमतानं निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची बारामतीत बैठक होईल आणि त्यानंतर एकमुखानं बारामती लोकसभा मतदार निवडणुकीसाठी मराठा समाजाचा एक उमेदवार ठरणार आहे आणि तोच उमेदवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.