Shivsena MP Phone Call to Eknath Shinde : महायुतीमध्ये मंत्रिपदावरुन आणि महत्त्वाच्या पदांवरुन रस्सीखेच सुरु असताना शिवसेना खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केलाय. शिवसेनेच्या खासदारांनी तुम्ही मंत्रीमंडळात सहभागी झाला नाही तर काय परिणाम होईल याची कल्पना दिली आहे. "महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नये… मी जर तुमच्या जागी असतो तर मीही मंत्रीमंडळात सहभागी झालो असतो…तुम्ही मुख्यमंत्री राहिल्यामुळं प्रशासनावर तुमची पकड निर्माण झाली आहे… त्यामुळं प्रशासनावर तुमचा जो वचक असेल तसा वचक दुसरा कोणाचाही नसेल…त्यामुळं तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे…", अशी मागणीही शिवनेसेच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंना केली आहे.
महायुतीमध्ये मंत्रिपदावरुन आणि महत्त्वाच्या पदांवरुन रस्सीखेच सुरु
महायुतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली होती. मात्र, सर्वाधिक जागा आल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे भाजपच्या मुख्यमंत्री झाला तरी चालेले आमचा त्याला पाठिंबा असेल, असं जाहीर केलेलं असलं तरी आपल्या वाट्याला चांगली खाती यावीत, यासाठी महायुतीतील प्रत्येक पक्ष रस्सीखेच करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान, आज (दि. 2) भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन ठाण्यातील शुभदीप बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दुपारीच देवेंद्र फडणवीस यांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती. अशात, फडणवीस यांचा काही संदेश गिरीश महाजन घेऊन गेलेत का? याकडेही सर्वांचे लक्ष आहेत. या भेटीत तब्येतीच्या विचारपूस सोबतच राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदेंचा कशा पद्धतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवावे, केसरकरांचे सूचक वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेपासून ते महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यात महायुतीतील प्रत्येक पक्ष प्रयत्न करताना दिसत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे दिले होते. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा कारभार पाहात होते. याशिवाय राज्यातील अनेक आंदोलनं हाताळण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश आले होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा मान राखला जावा, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. "आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करुन दाखवलं. आता त्यांचा कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, आम्ही ठरवणार नाहीत", असं सूचक वक्तव्य आमदार दीपक केसरकर यांनी केलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या