जळगाव: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीमधील घटकपक्षांमध्ये आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यावतीनं "निर्धार मेळावा" आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. याच मुद्यावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेळाव्यामध्ये जे घडलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडणार असल्याचं ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप शिवसेनेत दुरावा असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देवून ही त्यांनी गैर हजेरी लावल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली आहे.
गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना भूमिका मांडली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर भाषणात देखील बोललो आहे. आजच्या मेळाव्या मधे जे घडलं, त्या गोष्टी मी देवेंद्र फडणीस,गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या कडे मांडणार आहे, असही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
युतीत अशा गोष्टी नको, याचा परिणाम महाराष्ट्रावर
युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये ,याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल, असा इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी दिला.
मंगळवारी मुंबईत कॅबिनेट बैठक होणार आहे. त्या बैठकीत हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आपण एक संघ होतो म्हणून देशात विपरीत वातावरण असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागा आपल्या निवडून आल्या आहेत, अशी आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना करुन दिली.
लोकसभेप्रमाणं जर आपण विधानसभेत एकसंध राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात, असंही पाटील म्हणाले. मात्र, आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असा इशारा देखील पाटील यांनी दिला.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई होणार का हे येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल.
इतर बातम्या :
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?