Shivsena मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील जागांवरुन महायुतीमध्ये (Mahayuti) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यातच, मुंबईतील हायप्रोफाईल मतदारसंघ असेलल्या दक्षिण मुंबईतील जागेवर भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आली होती. भाजपा नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, अखेर येथील जागेवर शिवसेनेनं आपला धनुष्यबाण चालवल्याचे दिसून येते. दक्षिण मुंबईतून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा आता सुटला आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत विरूद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना आता दक्षिण मुंबईत रंगणार आहे. यामिनी जाधव या शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. मुंबईतील काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप महायुतीने जाहीर केलेले नाहीत. त्यापैकी दक्षिण मुंबईच्या जागेचा समावेश होता. मात्र, आता या जागेचा तिढा सुटला असून शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 






दरम्यान, सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरी दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये यामिनी जाधव यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपीने यापूर्वीच दिली होती. त्यानंतर, आज शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई हा मुंबईतील हायप्रोफाईल मतदारसंघ असून या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी या अगोदरच जाहीर झाली आहे. त्यामुळे, द. मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत आहे. या मतदारसंघासाठी भाजपाने फिल्डींग लावली होती, राहुल नार्वेकर यांनी भायखळ्यात प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आलं आहे.


दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यामिनी जाधव यांनी आनंद व्यक्त केला असून मला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी याची कल्पना नव्हती, असेही म्हटले आहे. तर, महायुतीने घेतलेला हा निर्णय माझ्यासाठी आनंदाचा असून महायुती एकत्र येऊन या मतदारसंघात आम्ही एकीने लढ आणि जिंकू, असे यामिनी जाधव यांनी एबीपीशी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.


हेही वाचा  


 T20 World Cup squad : गेल्या विश्वचषकातील उपकप्तानला वगळलं, ना रिंकू, ना रवी, टीम इंडियाची वैशिष्ट्ये काय?