Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीकडून (Mahayuti) अजूनही उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. महायुतीच्या तीनही पक्षांनी नाशिक लोकसभेवर दावा ठोकला आहे. नाशिकची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे. त्यातच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे अचानक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी शांतीगिरी महाराजांच्या (Shantigiri Maharaj) शिष्टमंडळाने गिरीश महाजनांची भेट घेत घेतली आहे. 


काल (दि. 29) शांतीगिरी महाराजांनी नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हा अर्ज दाखल करताना तो शिवसेना शिंदे गटाकडून दाखल केल्याची माहिती शांतीगिरी महाराजांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. 


शांतीगिरी महाराजांचे शिष्टमंडळ गिरीश महाजनांच्या भेटीला


नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असतानाच आज भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अचानक नाशिक दौऱ्यावर आले. गिरीश महाजनांची काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली. यावेळी शांतीगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


शांतीगिरी महाराज नाशिकचे महायुतीचे उमेदवार?


आज सकाळी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये गिरीश महाजनांसोबत शांतीगिरी शिष्टमंडळाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आता शांतीगिरी महाराजच नाशिकचे महायुतीचे उमेदवार असणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार नेमका कधी जाहीर होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


काय म्हणाले शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख?


शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) म्हणाले की, उमेदवारीबाबत शांतीगिरी महाराज यांच्याशी कोणतीही चर्चा नाही. त्यांनी महायुतीला पाठिंबा देण्यासाठी मी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. शिवसेना उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. आजपर्यंत नाशिकमध्ये उमेदवार कोण असणार यावर निर्णय नाही. कोणीही अफवा पसरू नये, आमचे नेते अधिकृतपणे उमेदवार जाहीर करतील, असे त्यांनी म्हटले होते.


इतर महत्वाच्या बातम्या