मुंबई महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु झालं असून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय नेते वेगवेगळ्या भूमिका घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. त्याच प्रमाणं शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria)आणि माजी आमदार विप्लव बजोरिया (Viplav Bajoria) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) यांची भेट घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. उध्दव ठाकरे यांना भेटल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचं म्हणत शिवसेना माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे.

  


विधान परिषदेतून निवृत्त झालेले शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया आणि माजी आमदार गोपिकिशन बजोरिया यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त काही टिव्ही चॅनल्समधून  प्रसारित करण्यात आले आहे. मात्र हे वृत्त साफ खोटे असून खोडसाळपणाचे असल्याचे गोपीकिशन बजोरिया यांनी म्हटले आहे.


विधान भवनातील लॉबी मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जात असताना समोरून उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे येताना दिसले. त्यांना मी नमस्कार सुद्धा  केले नाही भेटण्याची गोष्ट दूरची आहे असे गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितले.  उबाठा गटाची विश्वासाहर्ता संपली आहे. खोट्या बातम्या देऊन खोटी प्रसिध्दी करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगावे की मी त्यांना भेटलो होतो. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सत्य बाजू मांडणार असल्याचे गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितले.


गोपीकिशन बजोरिया यांची आज पत्रकार परिषद 


शिवसेना नेते गोपीकिशन बजोरिया यांनी ते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेत बंड केलं होतं. त्यावेळी विधानपरिषदेतून त्यांना सर्वप्रथम विप्लव बजोरिया यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे, आमशा पाडवी या आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. विप्लव बजोरिया हे नुकतेच विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत.  गोपीकिशन बजोरिया आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहे. ते या प्रकरणाबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या : 


आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'