मुंबई : राज्याच्या राजकारणात 2019 नंतर अनेक बदलाचे वारे पाहायला मिळाले, तर काही वादळंही आल्याचं दिसून आलं. गेल्या 4 वर्षातील राजकीय बदलाचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. शिवसेना पक्षातील मोठ्या बंडानंतर शिवसेना पक्षाचं नेतृत्त्वच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्याकडे घेतलं. शिंदेसोबत शिवसेनेतील 40 आमदारांनी सत्तेत जाणं पसंत केलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नव्याने रणशिंग फुंकलं. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच फूट पडली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना यशही आलं. त्यामुळे, विधानसभेपूर्वी आता शिवसेना (Shivsena) शिंदेंसोबत गेलेले आमदार ठाकरेंसोबत येतील, अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यातच, शिंदेंसोबत गेलेल्या एका माजी आमदाराने आज उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवारांच्या गटांतील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे आपण परत शरद पवारांकडे गेलं पाहिजे, असेही काहींचे म्हणणं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, आमचे सर्व आमदार आमच्यासोबतच आहेत, कुणीही कुठेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलंय. मात्र, अजित पवारांच्या आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे वृत्त विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माध्यमात झळकले होते. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडील एका माजी आमदाराने उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


शिंदेंच्या माजी आमदाराने घेतली ठाकरेंची भेट 


उद्धव ठाकरेंचा विधिमंडळातील पहिला दिवस गाजला तो लिफ्टभेट आणि चंद्रकांत पाटील यांच्यासमवेतच्या भेटीमुळे. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेसोबत झालेल्या भेटीची चर्चा रगंली आहे. गोपीकिशन बजोरिया आणि विप्लव बजोरिया या पिता पुत्रांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दुपारी पोहोचले होते. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात पुन्हा घेण्याबाबत या दोघांकडून विनंती करण्यात आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकार देण्यात आल्याचे समजते.  


गुरुवारी निवृत्त, शुक्रवारी ठाकरेंची भेट


शिवसेना पक्षाला सोडून गेलेल्यांबाबत विचार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच विप्लव बजोरिया विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. विधानपरिषेदेच आमदार म्हणून त्यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेना शिंदेंच्या गटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंना शिंदेंकडील आमदार परत आल्यास घेणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, आपण सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, अशा शब्दात स्पष्टपणे ठाकरेंनी भूमिका विशद केली आहे.


हेही वाचा


''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला


धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण