ठाणे : डोंबिवलीतील शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे निधन नसून त्यांची  हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून कल्याण न्यायालयाने संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गिता खरे , वर्षा देशमुख, प्रितम देशमुख , हर्षकुमार खरे , स्नेहा खरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार गटाचे प्रमोद हिंदुराव आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी केला आहे.


शिवाजीराव हे समर्थ समाज या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत होते


शिवाजीराव हे  समर्थ समाज या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत होते. या संस्थेत काही वर्षापूर्वी गिता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गिता खरे यांच्या बरोबर शिवाजीराव यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित होऊन त्यांनी तिच्या बरोबर विवाह केला. त्यांना वर्षा खरे हे अपत्य झाले. शिवाजीराव यांनी आसनगावसह अनेक ठिकाणी जागा घेऊन तेथे शिक्षण संस्थेची उभारणी केली. गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून, जोंधळे कुटुंबीयांना अंधारात ठेऊन या सर्व मिळकती स्वत:च्या नावावर करून घेतल्या असल्याचा आरोप पहिल्या पत्नीचा मुलगा सागर जोंधळे यांनी केला आहे.


खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवल्याचा आरोप 


शिवाजीराव जानेवारी 2022 मध्ये  यांना यकृताचा कर्करोग झाला. वितुष्ट दूर सारुन पहिल्या पत्नीचा मोठा  मुलगा सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. चेन्नई, मुंबई, डोंबिवलीतील रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले. सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळीक खरे कुटुंबीयांना आवडली नाही. सागरने वडिलांसाठी यकृत देण्याची तयारी केली. ती गिता खरे यांनी व्देषातून नाकारली. सागर व शिवाजीराव एक झाले तर आपणास शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही म्हणून गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवले. खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा 19 एप्रिलमध्ये 2024 मृत्यू झाला, असे सागर यांनी तक्रारीत म्हटले आहे.


आपल्या वडिलांच्या मृ्त्यूस खरे कुटुंब जबाबदार असल्याने त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर यांनी पोलिसांकडे केली होती मात्र राष्ट्रवादीचे नेते  प्रमोद हिंदुराव यांचे भाचे प्रीतम देशमुख  या घटनेत असल्यामुळे हिंदुराव पोलिसांवर दबाव टाकत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे शिवाजीराव जोंधळे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा सागर कल्याण न्यायालयात 10 जून 2024 रोजी न्यायालयात वडिलांचा झालेल्या छळाची हकीकत कथन केली असता न्यायालयाने 16 ऑगष्ट 2024 रोजी संबंधित घटनेचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश डोंबिवली विष्णुनगर पोलिसांना दिले.


इतर महत्वाच्या बातम्या 


जुगाराच्या नादात वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या, घराला आग लावून लाखोंचे दागिनेही लंपास; पोलिसांनी मात्र काही तासात हत्येचं गूढ उकललं