मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी पेंग्विन हा पक्षी मुंबईत आणण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, याच पेंग्विनवरील खर्चावरु त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन पक्षांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढला आहे. या कक्षातील पेंग्विनची संख्या गेल्या 6 वर्षात सात वरून अठरावर गेली आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.


मुंबईच्या राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याचवेळी मृत्यू झाला. त्यानंतर 7 पेंग्विन या कक्षात होते. मग या पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाली आणि त्याचाही प्राणीसंग्रहालयाने उत्सव केला. या पेंग्विनच्या पिल्लांचे नामकरणही प्राणीसंग्रहालयाने केले आहे. पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात वाढून तब्बल 18 वर गेली आहे. यात दहा मादी आणि आठ नर यांचा समावेश आहे. पेंग्विनची संख्या वाढण्याबरोबरच पेंग्विनच्या देखभालीचा खर्चही यंदा वाढला आहे. प्राणीसंग्रहायल व्यवस्थापनाने पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांकरीता निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठीचा अंदाजित खर्च 20 कोटी 17 लाखांवर आहे. तीन वर्षांपूर्वी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने जेव्हा निविदा मागवल्या होत्या, तेव्हा त्याचा खर्च 15 कोटी एवढा होता. आता, त्यात 5 कोटींची वाढ झाली असून तो 20 कोटींपर्यंत पोहोचला आहे.


प्राणीसंग्रहालयाचा महसूलही वाढला


पेंग्विनची संख्या आणि देखभाल खर्च वाढलेला असला तरी पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहालयाचा महसूलही वाढला असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पेंग्विन कक्षाच्या उभारणीआधी प्राणीसंग्रहालयाचे 2014 ते 2017 या तीन वर्षांचे उत्पन्न 2 कोटी 10 लाख रुपये होते. नंतर हे उत्पन्न दरवर्षी वाढत गेले असून 2013 मध्ये 12 कोटींचा महसूल जमा झाला तर 2024 मध्ये गेल्या आठ महिन्यात 5 कोटी 91 लाखांचा महसूल जमा झाला आहे.


विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी दिलं होतं स्पष्टीकरण


शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आग्रहानंतर मुंबई महापालिकेने पेंग्विन आणले होते. पर्यंटकांची या पेंग्विनला दादही मिळत आहे. मात्र, विरोधकांकडून आदित्य ठाकरेंवर पेंग्विनच्या मुद्द्यावरुन टीका केली जाते. त्यावर, आदित्य ठाकरेंनीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. एकदा शिवसेनेचच अधिवेशन होतं, त्यामध्येच मी सांगितलं होतं की, मी पेग्विंग आणल्याचा मला अभिमान आहे. कारण प्रत्येक दिवशी, सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष आहेतच, पण आजही आठवड्यात जवळपास हजारो लोकं त्याला भेट देतात. संपूर्ण राणीची बाग बघायला 100 रुपये तिकीट आहे, त्याचं उत्पन्न आता कोट्यावधी रुपयांच्या घरात गेलं आहे. त्या प्राणीसंग्रहालयाचं उत्पन्न हे तोट्यात होतं, त्या पेंग्विन्जमुळे ते फायद्यात गेलं. आता तेच पेंग्विन लखनऊ प्राणीसंग्रहालय मागतंय, गुजरातमधलही एक प्राणीसंग्रहालय मागतंय. योगायोगाने दोन्हीही भाजपची राज्य आहेत, असे आदित्य यांनी म्हटलं होतं.  


हेही वाचा


शिंदेंच्या आमदारास पोलिसांनी दाखवला इंगा, तलवार केकप्रकरणी अखेर गुन्हा दाखल