Maharashtra Politics नागपूर :

  :  मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Shivaji statue collaps) मविआ (Maha Vikas Aghadi) आज राज्यभर जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करत आहे. दरम्यान, या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाहीये. तर मविआच्या आंदोलनाला महायुतीनेही आंदोलनातूनच प्रत्युत्तर देत आहे.


मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. मविआच्या याच आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही सहभाग घेत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घाणाघात केला आहे. नागपूरच्या (Nagpur News) महाल येथील शिवतीर्थ परिसरात चंद्रशेखर बावनकुळे सहभाग झाले असून मविआच्या जोडे मारो आंदोलनाच्या विरोधात भाजपनं खेटरं मारो आंदोलन पुकारले असून बदमाशी करणाऱ्या मविआला आम्ही खेटरं मारत असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. 


राज्यात निव्वळ अराजक पसरवण्याचे मविआचे प्रयत्न- चंद्रशेखर बावनकुळे  


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज राज्यभरात महायुतीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साऱ्यांसाठी वंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली, देशातील तमाम शिवभक्तांची ही माफी मागितली. शिवरायांचे स्मारक दुर्घटनेत ज्या ज्या व्यक्तींच्या हृदयाला ठेच पोहचली त्यांची देखील माफी मागितली. तरीदेखील महाविकास आघाडीचे नतदृष्टे नेते राजकारण करत असून निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात अराजक पसरवण्याचे काम करत आहे. 


शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आमच्या प्रश्नांची उत्तर देतील का? 


मात्र या साऱ्या नेत्यांना माझा पहिला प्रश्न आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू, दरोडेखोर असा केला  आहे. याचे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देतील का? मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे असताना छिंदवाडा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझर लावून पाडण्यात आला, याचे उत्तर नाना पटोले देतील का?  संजय राऊत यांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशज यांना आपल्या वंशज असल्याचा पुरावा मागितला, याचा उत्तर उद्धव ठाकरे देतील का? जितेंद्र आव्हाड यांनी एकदा असे म्हटले होते की, अफजल खान शाहिस्तेखान नसते तर शिवरायांची ओळख नसती, यावर त्यांचे नेते शरद पवार साहेब हे उत्तर देतील का?


असे असताना एक दुर्घटना झाली, त्यात आमच्या पक्षातील उच्चपदस्थ सर्व नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागितली. तरी देखील केवळ राजकीय हेतूने महाविकास आघाडीने अतिशय खालचा स्तर गाठला आहे. म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती रस्त्यावर उतरली असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केलंय  


जोडे मारो आंदोलनाला भाजपचं खेटरं मारो आंदोलन


एक लाख टक्के हे केवळ राजकीय हेतूने महाविकास आघाडीने पुकारलेले आंदोलन आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीची मागणी केली होती, त्यानुसार पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि त्यांनी माफी मागितली. असे असताना या उपर महाविकास आघाडीला नेमकं पाहिजेल तरी काय, हे आम्हाला कळालेलं नाही. मविआला केवळ मतांचे राजकारण करायचे आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकांचे त्यांना काहीही देणंघेणं नाही. शिवरायांचा त्यांनी वारंवार अपमान केला असून आता केवळ राजकीय हेतूने हे आंदोलन करत आहेत. त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं असेल तर आम्ही खेटरं मारो आंदोलन पुकारले आहे. कारण तुम्ही बदमाशी केली असून महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक असल्याची टीकाही  भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


हे ही वाचा