Shivajirao Adhalarao Patil : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील शनिवारी (दि.22) अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश ठरला आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार गटाच्या आजी-माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मुंबईत बोलावलं आहे. आढळराव पाटील आज रात्री मुंबईला रवाना होणार आहेत.
अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता
शिरुर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. शिवाय शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील या जागेवरुन लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांना पक्षप्रवेश देत अमोल कोल्हे यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याचा अजित पवारांचा इरादा आहे.
2019 मध्ये अमोल कोल्हेंकडून पराभूत
खासदार अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढली होती. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शिवाजी आढळराव पाटील?
शिवाजी आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. ते मूळचे आंबेगाव तालुक्यातील आहेत. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. सलग तीन वेळेस त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
इतर महत्वाच्या बातम्या