Maharashtra Legislative Council : शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) यावर आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. तर विधानपरिषदेत शिवसेनेने विरोधी पक्षनेता केला, त्याला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी जळगावात दिली आहे. ते पुढे म्हणाले की, "संख्याबळ पाहता जवळपास सर्व समान असल्याने काँग्रेसलाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देणे आवश्यक असून याबाबत गुरुवारी (11 ऑगस्ट) तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून या याबाबत चर्चा होईल." "दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप असून आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे," अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.
विधानपरिषदेत शिवसेनेना विरोधी पक्षनेता केला त्यास आमचा विरोध : नाना पटोले
शिवसेनेने विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेता केला त्याला आमचा विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले हे संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅली निमित्त बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड केल्याबद्द नाराजी व्यक्त केली.
अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने 9 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून शिवसेनेला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिली. तसंच शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करुनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली होती. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहे, आपापसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे, असं अरविंद सावंत म्हणाले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल काय?
78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 - 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा रिक्त आहेत.