मुंबई: एकीकडे मोठा आटापिटा करून कल्याणची जागा (Kalyan Lok Sabha Election) आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवणाऱ्या एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आता उद्धव ठाकरे मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कल्याणमधून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  यांच्याविरोधात स्व. आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ज्या 20 जागा लढवण्यात येणार आहेत त्यामध्ये कल्याणची जागा हिटलिस्टवर असल्याची माहिती आहे. 


एखादी दुसरी जागा सोडता राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटपावर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये ठाकरे गट जवळपास 20 जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्या 20 ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवारही अंतिम असल्याची माहिती आहे. त्यामध्ये कल्याणमधून स्व. आनंद दिघेंच्या पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याची चाल ठाकरे गटाकडून खेळण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


केदार दिघे कल्याणमधून?


शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून राजन विचारे लढतील असं सांगण्यात येतंय. त्यानतंर मुंबई उत्तर या ठिकाणाहून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांना तिकीट देण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यातच आता केदार दिघेंनाही कल्याणमधून तिकीट देऊन श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं जाणार असल्याची माहिती आहे. 


श्रीकांत शिंदेंची जागा धोक्यात? 


कल्याणच्या जागेवर या आधी महायुतीमधील भाजपकडून दावा करण्यात येत होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणसाठी अडून बसल्याने भाजपने ती जागा शिवसेनेसाठी सोडली. पण त्या बदल्यात मुंबईतील जागा भाजपने पदरात पाडून घेतल्याची चर्चाही सुरू आहे. 


ठाणे आणि कल्याणच्या जागा या सुरुवातीपासूनच ठाकरे गटाच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती आहे. त्यामध्ये ठाकरे गटाकडून ठाण्यातून राजन विचारे हेच लढणार हे नक्की आहे. पण कल्याणमधून कोण उमेदवार उभा करायचा यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे कधी आदित्य ठाकरे यांचे नाव तर कधी सुषमा अंधारे यांचे नाव चर्चेत होतं. सुषमा अंधारे यांनी तर कल्याणमधील अनेक ठिकाणच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. 


पण आता कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून मोठी चाल खेळण्याची तयारी सुरू केलीय. ज्या स्व. आनंद दिघेंचे नाव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण करतात त्या दिघेंच्या पुतण्यालाच, केदार दिघे यांनाच श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तिकीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. असं जर झालं तर श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मोठं आव्हान असेल.  


कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद


कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचं अनेकदा चव्हाट्यावर आलं आहे. त्यातूनच डोंबिवलीमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांचं  काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या गणपत गायकवाडांनी शिवसेनेच्या महेश गायकवाडांवर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटनाही घडली होती. 


ही बातमी वाचा: