पुणे : शिरूरचा राष्ट्रवादीचा खासदार ठरला असून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे 26 मार्च रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आढळराव पाटील हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे नक्की झालंय. त्यामुळे उमेदवार गेल्या लोकसभेचेच असतील, पक्ष मात्र वेगळा असेल. 


शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील येत्या 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आढळरावांचं महायुतीचं तिकीट जवळपास निश्चित आहे. एकनाथ शिंदेंनी जुलै 2022 मध्ये बंड केल्यावर आढळराव पाटील त्यांच्यासोबत गेले होते. आजही त्यांचे शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत. पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली, उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलं. म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 


पक्षप्रवेश करतोय, मग उमेदवारी मिळणार का नाही हे विचारू नका


माझा पक्ष प्रवेश माझ्या मतदारसंघात 26 मार्चला होणार आहे . राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मी निव़डणुकीला उभा राहमार असून ही जागा नक्कीच जिंकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे. या दोघांनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली असून त्यांनी माझ्या पक्षप्रवेशाला क्लीन चिट दिली आहे. माझा पक्षप्रवेश होत आहे, त्यामुळे उमेदवारी निश्चित होणार का असे प्रश्न विचारण्याची गरज नाही. 


2019 चा बदला घेणार


गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. त्यावर बोलताना आढळराव म्हणाले की, "गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभा राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100 टक्के खात्री आहे. माझं जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार पहिली निवडणूक मी तीस हजाराने जिंकलो, दुसरी मी एक लाख 80 हजार जिंकलो, तिसरी तीन लाखाने जिंकलो. आता ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल. त्यामुळे यावेळी माझा विजय हा नक्की आहे."


पंतप्रधान मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आणि सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


ही बातमी वाचा: