मुंबई: राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचं घोडं अडलंय, त्यापैकी एक म्हणजे सातारा. सातारा मतदारसंघ (Satara Lok Sabha Election) अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) तीन दिवस दिल्लीत तळ ठोकलाय. पण अद्याप त्यांच्या हाताला काही लागत नसल्याचं चित्र आहे. अशात आता भाजपच्या नरेंद्र पाटलांनी (Narendra Patil) आपला पत्ता टाकला आहे. साताऱ्यातून भाजपने आपल्यालाच उमेदवारी मिळावी असं सांगत त्यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 


माझा जनसंपर्क चांगला, तिकीट मलाच मिळावं


माध्यमांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील म्हणाले की, ज्यावेळी उदयनराजेंसमोर लढण्यासाठी कुणीही तयार नव्हतं त्यावेळी पक्षाने आदेश दिला आणि मी निवडणूक लढवली. त्यामुळे आजही माझा दावा सातारा लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी अशी इच्छा आहे. खासदार  म्हणून  मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग, राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.   


सध्या खासदारकीची निवडणूक आहे, येणार्‍या काळात विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे चांगला कामगार नेता, मंत्री जर या राज्याला मिळाला तर चांगले आहे. नाहीतर आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षा भविष्यात अधिक वाईट असू शकते असं नरेंद्र पाटील म्हणाले. 


उदयनराजेंना अमित शाहांची भेट मिळत नाही याचं वाईट वाटतंय


उदयनराजे  हे छत्रपती आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी तीन दिवस दिल्लीत मुक्काम टाकला आहे. पण त्यांना अमित शाहांची भेट मिळत नाही याच वाईट वाटते. एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. दुसर्‍या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य  आहेत. तरी देखील त्यांना भेट मिळत नाही.


सातारा निवडणूक जागेसाठी पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे उदयनराजेंनी सबुरीने घेणे गरजेचे आहे. पक्षाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. मग तो निर्णय कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. पण केंद्रात  मोदी यांच्या बाजूने 405 खासदार देण्यासाठी आम्ही सयुक्तपणे काम करू. 


माथाडींमध्ये गुंड  प्रवृत्ती वाढत चालली आहे, पैसे घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. यात आता परिवर्तन व्हावं असं नरेंद्र पाटील म्हणाले. 


ही बातमी वाचा :