मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि ठाकरे गटासंबंधित फेक नरेटिव्हला आळा घालण्यासाठी ठाकरे गटाने खास रणनीती आखली आहे. शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) डिजिटल शाखा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे समोर येत आहे.  


सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठाकरे गटाच्या माध्यमातून डिजिटल शाखेकडून आता नियंत्रण ठेवले जाणार आहे. एक वर्षांपासून ठाकरे गटाच्या युवासेनेकडून डिजिटल शाखेचे काम केले जात असून शिवसेना करत असलेले काम देखील या शाखेच्या माध्यमातून दाखवले जात आहे.  


निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डिजी शाखेवर भर


शिवसेनेच्या कामासोबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पक्षातील नेते आणि ठाकरे गटाच्या संबंधित फेक नरेटिव्हला आळा घालण्यासाठी डिजिटल शाखेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक डिजिटल शाखा समन्वयक नेमण्यात आला आहे. त्याचसोबत नवीन नियुक्त्या देखील या महिन्यात करण्यात येणार आहेत.  हे डिजिटल शाखा समन्वयकांवर नागरिकांचे सोडवण्यात येणारे प्रश्न सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डिजी शाखेवर ठाकरे गटाकडून अधिक भर दिला जाणार आहे. या डिजी शाखेवर युवासेना कोअर कमिटीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.  


उद्धव ठाकरे घेणार आमदार-खासदारांची बैठक


दरम्यान, गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातील माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. अर्थशंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. त्या सोबतच ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे हे  20 फेब्रुवारीला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक घेणार आहेत. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक उद्धव ठाकरे घेणार आहेत. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चित होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  



आणखी वाचा 


उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला