Anjali Damania : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे (Walmik Karad) नाव आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याने विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूचक वक्तव्य केले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे, असे म्हणत अजित पवारांनी राजीनाम्याचा विषय धनंजय मुंडेंच्या कोर्टात ढकलला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवारांनी मस्करी चालवली आहे का? धनंजय मुंडेंची कसली नैतिक जबाबदारी? इतके पुरावे दिल्यानंतर त्यांचा थेट राजीनामा घ्यावा. सुरेश धस गुप्तपणे धनंजय मुंडेची भेट घेऊच कशी शकतात? रोज मीडियाला बाईट देतात ना, मग या भेटीविषयी का बोलले नाहीत? यात त्यांचा काय आहे हे स्पष्ट दिसतंय, असे म्हणत अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय.
संतोष देशमुख प्रकरणी पोलीस अद्याप गप्प का?
तर आमदाराचा मुलगा प्रायव्हेट जेटनं पळून जातो तेव्हा पोलीस पत्रकार परिषद घेतात. पुण्यात कार अपघात होतो तेव्हा पोलीस पत्रकार परिषद घेतात. मग संतोष देशमुख प्रकरणी पोलीस अद्याप गप्प का? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलिसांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत अंजली दमानिया यांनी पोलिसांवर निशाणा साधलाय.
एक मंत्री किती दहशत माजवणार?
अंजली दमानिया यांनी पुढे म्हटलंय की, धनंजय मुंडे यांनी कृषि घोटाळा कसा केलाय, हे स्पष्ट झालंय. AgriBegri या वेबसाईटवर मी काही खतांची ऑर्डर केली होती. माझी ऑर्डर स्वीकारली होती, ते प्रॉडक्ट हरियाणाहून निघाले देखील होते. पण, माझ्याकडे पोहचण्याआधीच ते थांबवण्यात आलंय.याला जबाबदार कोण? अजित पवारांनी याचं आता उत्तर द्यावं. याची चौकशी दोन दिवसांत करण्यात यावी. मंत्री ठरवणार राजीनामा कधी देणार? मुख्यमंत्री, पक्ष याला काहीच किंमत नाही. जनता मुर्ख आहे का? एक मंत्री किती दहशत माजवणार? असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा
