Shiv Sena UBT Jan Akrosh Andolan : महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) आज राज्यभरात आंदोलनाचे हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाने अनोखे आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. महायुतीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे. तर अमरावती येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा मुखवटा घालून डान्स त्यांच्यावर नकली पैसे उधळण्यात आले.

Continues below advertisement


तर ठाण्यामध्ये आंदोलन स्थळी कार्यकर्त्यांनी पैशाने भरलेली बॅग आणल्याचे पाहायला मिळाले. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत पत्ते देखील आणले होते.  


पुण्यात जनआक्रोश आंदोलन


पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोख्या पद्धतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. कलंकित मंत्र्यांविरोधातल्या आंदोलनासाठी शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी अनोखी वेशभूषा केली होती. भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओम फट स्वाहाच्या घोषणा देखील करण्यात आल्या. 


बीडमध्येही रास्ता रोको आंदोलन


महायुतीतील विशेषतः शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात बीडमध्ये ठाकरे गटाकडून निदर्शन करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अलीकडील काळात शिंदे गटातील मंत्री वादग्रस्त ठरत असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करत तासभर रास्ता रोको करण्यात आला. शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अण्णाभाऊ साठे चौकात आंदोलन करण्यात आले. या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


धुळ्यात आक्रोश मोर्चा 


धुळ्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला या मंत्र्यांनी कलंकित केले असून त्यांचे तात्काळ राजीनामे घेतले जावेत, अशी मागणी या मोर्चाच्या वेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 


रत्नागिरीत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी!


रत्नागिरीत महायुती सरकारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात एक विचित्र प्रकार घडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांकडून चक्क महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "महाविकास आघाडीचं करायचं काय? खाली डोकं, वर पाय!" अशा घोषणा दिल्या गेल्याने उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही वेळानंतर पदाधिकाऱ्यांच्या लक्षात हे चुकतं असल्याचं आल्यावर घोषणांमध्ये तातडीने बदल करण्यात आला.



इतर महत्त्वाच्या बातम्या 


मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या