Sanjay Raut letter to Amit Shah मुंबई : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अचानक दिसेनासे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान याच मुद्द्यवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना एक महत्त्वाचा मुद्दा हाती लागला आहे. तर जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कुठे आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? हे अद्याप समजलेले नाही. ते अचानक एकाएकी कुठे आहेत, असा सवाल करत त्यांची चिंता इंडिया आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
तर दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता यासंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहीले आहे. उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता या पात्रातून व्यक्त करण्यात आली आहे. सोबतच जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी ही या पत्रातून केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वजण चिंतीत आहोत. दिनांक 21 जुलै रोजी संसदेच्या कामकाजादरम्यान राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवण्यात आले. यामागचे कारण सभापतींच्या प्रकृती अस्वास्थ्याचे असल्याचे सांगण्यात आले. ही एक सामान्य घटना आहे, परंतु त्यानंतर घडलेल्या काही गोष्टी अधिक धक्कादायक आणि चिंताजनक आहेत." असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
विरोधकांकडून सरकारला सवाल, कपिल सिब्बल यांना 'लापता लेडीज' सिनेमा आठवला
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर सध्या कुठे गायब आहेत, धनखडांचे काय झाले? असे प्रश्न संजय राऊत यांनी यापूर्वी हि उपस्थित केला होता. राजकीय व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असा आरोप त्यांनी त्यावेळी केला. विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन, रशियामध्ये आहे, असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं.
दरम्यान काँग्रेसचे जुने नेते आणि सपाकडून राज्यसभेत पोहोचलेल्या कपिल सिब्बल यांना 'लापता लेडीज' हा सिनेमा आठवला, तर संजय राऊतांना थेट विरोधकांना संपवणारे देशच आठवले. त्याचवेळी राजस्थानमध्ये धनखड यांचं समर्थन करणाऱ्या प्रवक्त्याला भाजपनं सहा वर्ष निलंबित केलं. हाच धागा पकडत आता संजय राऊत यांनी थेट अमित शाहांना पात्रातून धनखड यांच्या बाबत माहिती देण्यासंदर्भात पात्र लिहलं आहे.
आणखी वाचा