मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उत्तर पश्चिम मुंबई (Mumbai North west) अर्थात वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली. त्यामुळे आता रवींद्र वायकर यांचा सामना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याशी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत रंगणार आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमची उत्तर पश्चिम मुंबईची लढाई आणखी सोपी केली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
सचिन अहिर म्हणाले, "मी शिंदे गटाचे अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला ही निवडणूक सोपी करुन दिली. रवींद्र वायकर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कुठल्या परिस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर निवडून येत होते, तिथेच पहिलं लीड आम्हाला मिळेल. ही निवडूक आम्हाला सोपी झाली"
यावेळी सचिन अहिर यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही हल्लाबोल केला. वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होता, किरीट सोमय्या यांनीही त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यावर सचिन अहिर म्हणाले, "किरीट सोमय्या यांनी आता स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांच्या प्रचाराला यावं. भाजप सोडा पण अंतर्गत पक्षात उमेदवार मिळत नाही म्हणून नाईलाजास्तवर वायकर यांना उमेदवारी दिली. मुंबईच्या सर्व जागांवर त्यांना उमेदवार बदलावा लागला, नवे उमेदवार द्यावे लागतात, इथेच आमचा विजय आहे"
अमोल किर्तीकर नवखे उमेदवार, मला अनुभव आहे असं रवींद्र वायकर म्हणाले होते. त्यावर सचिन अहिर म्हणाले, उमेदवारापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन वायकरांना उमेदवारी दिली आहे. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणार आहेत का? त्यांना कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतला हे सर्वांना माहिती आहे. उद्या त्यांचा पराभव होणार आहे, त्यामुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी देणार आहेत का? त्यांनी मुंबई महापालिकेची तयारी करावी, असं सचिन अहिर म्हणाले.
आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या
सचिन अहिर म्हणाले, "रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमची उत्तर पश्चिम मुंबईची लढाई आणखी सोपी केली आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मी काही प्रश्न उपस्थित करतो याची उत्तरे मिळावी. रवींद्र वायकर प्रचार करताना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतील का? भाजपचे किरीट सोमय्या स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांचा प्रचार करतील का? जर ते खासदारकीला पराभूत झाले तर त्यांना पुन्हा महापालिकेसाठी तयारी करावी लागणार का?", असा खोचक सवाल अहिर यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा