मुंबई: जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर हे रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते आपल्या घरातून वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, वर्षा बंगल्यावर जाण्यापूर्वी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी जोगेश्वरी क्लब हाऊसमध्ये जाऊन गणपतीची पूजा केली. यानंतर ते कार्यकर्त्यांची भेट घेऊन बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांचा त्यांना गराडा पडला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी प्रश्न विचारला असता रवींद्र वायकर हे भावूक होताना दिसले.


उद्धव ठाकरे हे काल तुमच्या मतदारसंघात आले होते. तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत केलं. तुमचे इतक्या वर्षांचे ऋणानुबंध आहेत, असा प्रश्न यावेळी रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी गाडीत बसून निघण्याच्या घाईत असलेल्या रवींद्र वायकर यांचा पाय अडखळला. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आले तेव्हा मी त्यांचं स्वागत केले. ते आले की मी स्वागत करणारच ना. हे शब्द बोलताना रवींद्र वायकर यांचा कंठ दाटून आला होता. त्यांचे डोळेही थोडेफार पाणावले होते. यानंतर रवींद्र वायकर  फार काही न बोलता वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. 


रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. मात्र, अलीकडेच न्यायालयातील सुनावणीवेळी मुंबई महानगरपालिकेने याप्रकरणात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध असलेले आरोप मागे घेतले होते. त्यामुळे रवींद्र वायकर हे कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित झाले होते. परंतु, या सगळ्याचा संबंध रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाशी असल्याची चर्चा आहे. रवींद्र वायकर हे तपासयंत्रणांच्या दबावामुळे शिंदे गटात प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


रवींद्र वायकर मनापासून शिंदे गटात जात नाहीयेत: विजय वडेट्टीवार


रवींद्र वायकर हे मनापासून शिंदे गटात प्रवेश करत नसल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. वायकर यांना खूप त्रास देण्यात आला. सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर दबाव आणला. एकदा  तर ते आमच्याशी बोलताना इमोशनल झाले होते. त्यामुळे रवींद्र वायकर स्वेच्छेने शिंदे गटात जात आहेत, असे कुणीही समजू नये. ते सगळे दबावाने घडवून आणण्यात आले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंची साथ देणार; आज जाहीर पक्षप्रवेश