ठाणे: शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून (Ambernath News) दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून शहरातील शिवसेनेच्याच (Shivsena) दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किणीकर (Balaji Kinikar) हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मा,त्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाबा सिद्दीकींची वांद्रे परिसरात हत्या
काही दिवसांपूर्वी वांद्रे परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. तीन मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. वांद्रे पश्चिम परिसर हा बाबा सिद्दीकी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे त्यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या काही मारेकऱ्यांना अटक केली होती. अजूनही याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
आणखी वाचा