मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Election 2024) उमेदवारी देण्यास महायुतीत उशीर झाल्याने भुजबळांनी माघार घेतली होती. त्यानंतर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर छगन भुजबळ यांनी महायुतीला (Mahayuti) अडचण निर्माण होईल, अशी अनेकदा वक्तव्य केली.
अलीकडेच राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2024) छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज महायुतीची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या जिल्ह्यात असूनदेखील या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता शिवसेना शिंदे गटाने अजित पवारांना (Ajit Pawar) सुनावले आहे. भुजबळ कोणकोणत्या गोष्टीवर नाराज असता, याबाबत अजित पवार यांनी एकदाचा निर्णय घ्यावा, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे.
अजितदादांनी फायनल निर्णय घ्यावा
संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीची नाशिक येथे बैठक नाही. ती विभागीय बैठक आहे. काही कामानिमित्त भुजबळ गेले नसतील तर वेगळा अर्थ घेऊ नये. जेव्हा वरिष्ठ नेत्यांची बैठक असते तिथे गैरहजर राहिल्याने त्याला गांभीर्याने घेतले जाते. मात्र छगन भुजबळांची नाराजी महायुतीला त्रासदायक ठरत आहे. भुजबळ कोण कोणत्या गोष्टीवर नाराज असतात, याबाबत अजित पवार यांनी एकदाचा निर्णय घ्यावा. अनेक ज्येष्ठ लोकांना टाळलं जातं. अनेकांना न्याय मिळत नाही. राजकारणात प्रत्येक जेष्ठाचा सन्मान होतोच असं नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नाराजीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चांवर नाशिक येथे स्पष्टीकरण दिले आहे. सध्या वड्याचे तेल वांग्यावर असं सुरू आहे. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते. काही मीटिंगला आमचे पदाधिकारी जातात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या