Ambadas Danve on Chhagan Bhujbal : राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजप महायुतीला पराभवाचा मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने आगेकूच केली आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात अनेक कारणमीमांसा रंगतान दिसत आहे. अशातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची नाशिक लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र, महायुतीकडून ही जागा शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेला सुटली. त्यामुळे त्यांना लोकसभा लढवता आली नाही. त्यानंतर राज्यसभेची जाण्याची संधी असताना अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली.


शिवाय, छगन भुजबळ सातत्याने महायुतीच्या विरोधात वक्तव्य करतानाही दिसले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का? ते सध्या नाराज आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. 


भाजपच्या मागे कधीही मराठा समाज नव्हता


भाजपचा डीएनए ओबीसी आहे, असे देवेंद्र फडणवीस वेळोवेळी म्हणाले आहेत. त्यामुळे काही लोक नाराज होणार, हे स्वाभाविक आहे. दुसऱ्यासाठी खड्डे खोदणारे तुम्ही कधीतरी खड्ड्यात पडणार ना. भाजपच्या मागे कधीही मराठा समाज नव्हता आणि राहणार ही नाही. शेठजी भटजीचा पक्ष आहे असे लोक म्हणतात. त्यामुळे छगन भुजबळ यांना संधी असूनही आणि त्यांची इच्छा असूनही त्यांची इच्छा मारली जात आहे, याची किंमत कदाचित त्यांना मोजावी लागेल, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


गुजरातचे गुत्तेदर पोसण्यासाठी गणवेश मिळाले नाहीत


आज राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यात 48 लाख विद्यार्थी आहेत. मात्र, गुजरातचे गुत्तेदर पोसण्यासाठी आज राज्यात विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. ना कापड आलं आहे ना शिवलेला ड्रेस आहे. अजून किमान दीड महिना गणवेश मिळणार नाही. गुत्तेदर टक्केवारीसाठी काम सुरुये का, असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  हे अक्षम्य दुर्लक्ष आहे. ड्रेस बाबत जुनी पद्धत बरी होती, मात्र कंत्राटदार यात नव्हते, कुणा एककडून टक्केवारी घेण्यासाठी हे सगळं केलं आणि दुर्दैवाने विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नाहीत, असेही अंबादास दानवे म्हणाले. 


शरद पवार साहेब, उद्धव साहेब, नाना पटोले पत्रकार परिषदेला येतील. त्यात काय ठरवायचं ते पक्षाचे नेतृत्व सभाळतील. कुणीही त्यात भाष्य करण्यात काही अर्थ नाही. कुरघोडी वगैरे काहीही नसते, कोण काय काय बोलले हे ही पहायला पाहिजे, जागा वाटप ठरले नसताना आम्ही इतके जागा लढणार हे ही बोलणे योग्य नाही. असे म्हणत अंबादास दानवे यांनी आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


चर्चेनंतर हळू हळू चित्र स्पष्ट होईल


शेतकर्‍यांना अजूनही कर्ज मिळाले नाही. त्यात बोगस बियाणे वाटले जात आहे. सरकार यावर ही कारवाई करत नाही. विजेचे प्रीपेड मीटर हा ही घोळ आहे. वीज उपलब्ध नाही, थोड्या पावसाने खांब पडतात आणि हे 12 हजाराचे मीटर लावणार आहेत. हे योग्य नसल्याचे ही  अंबादास दानवे म्हणाले. वंचित भाजपची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. उगाच धूळफेक कशाला करता, तुम्ही फक्त मत खायला लढताय. 288 तयारीला लागा याचा अर्थ आमची ताकत असली पाहिजे. सोबतच्या लोकांना निवडून आणायला ही ताकत लागेल ना. जागा वाटपात इथे मोठा,  छोटा कुठलाही प्रश्न नाही, मेरिट नुसार जागावाटप होणार. तसेच चर्चेनंतर हळू हळू चित्र स्पष्ट होईल.असेही अंबादास दानवे म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या